फोटो सौजन्य: सोशल मीडिया
तापेइ: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते सध्या पॅसिफिक बेटांच्या आठवड्याभराच्या दौऱ्यावर आहेत. लाइ चिंग-ते यांनी अमेरिकेच्या हवाई मधून आपल्या दौऱ्याची सुरूवात केली. हावाईमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान अमेरिकेने तैवानला अधिक शस्त्रास्त्रे विकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे चीन अमेरेकेच्या या मदतीने चीन संतापला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यूएस स्टेट डिपार्टमेंटने तैवानला $385 दशलक्ष किमतीचे स्पेयर पार्ट्स , F-16 जेट आणि रडारसाठी मदत मंजूर केली आहे. या मदतीचा चीनने तीव्र विरोध केला आहे.
संपूर्ण घटनेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल- चीन
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संपूर्ण घटनेवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि देशाच्या सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. चीनने अमेरिकेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत स्पष्ट केले आहे की, तैवानच्या स्वतंत्र दलाला चुकीचा संदेश दिला जात आहे. त्यांनी सूडबुद्धीने कारवाई करण्याचा इशाराही दिला. तसेच चीनने स्पष्ट केले आहे की, या मदतीचे अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील.
अमेरिका आणि तैवानने युद्ध रोखण्यासाठी एकत्र यावे
तर, दुसरीकडे तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते यांनी हवाईतील पर्ल हार्बर येथे यूएसए ऍरिझोना मेमोरियलला भेट दिली. तेथे त्यांनी शांततेचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले की, अमेरिका आणि तैवानने युद्ध रोखण्यासाठी एकत्र काम करायला हवे. युद्धात कोणाचाही विजय होत नाही, शांतता अमूल्य आहे असे त्यांनी म्हटले. लाइ चिंग-ते पुढील काही दिवसांमध्ये मार्शल बेटे, तुवालू आणि पलाऊलाही भेट देणार आहेत. या राष्ट्रांनी तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे या भागांमध्ये तैवानचा प्रभाव वाढवणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
चीनला तैवानवर कब्जा करायचा आहे
चीन तैवानला आपला हिस्सा मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो. त्यामुळे चीनला तैवानवर कब्जा करायचा आहे. तैवानवर वर्चस्व मिळवून चीन पश्चिम प्रशांत महासागरात आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतो, यामुळे अमेरिकेच्या हवाई व गुआमसारख्या लष्करी तळांना धोका निर्माण होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.
यामुळे चीन-अमेरिका संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, तैवान हा अत्याधुनिक सेमीकंडक्टर उत्पादनात अग्रगण्य असल्याने त्याचे आर्थिक महत्त्वही प्रचंड आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, तैवान व अमेरिका यांचे संबंध अधिक दृढ होत आहेत, तर चीनने आपली नाराजी व्यक्त करत प्रतिकाराची भूमिका घेतली आहे.