बीजिंग : चीनमधून रेल्वे अपघाताची (China Train Accident) मोठी बातमी समोर येत आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असताना आता दोन रेल्वेची धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ५१५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींपैकी 102 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत..
[read_also content=”फायटरचं पहिलं गाणं रिलीज, दीपिका पादुकोण-हृतिक रोशनची कमाल केमिस्ट्री; तुम्हीही थिरकल्याशिवाय राहणार नाही! https://www.navarashtra.com/movies/fighter-song-sher-khul-gaye-starring-hrithik-roshan-deepika-padukone-release-nrps-489102.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंगच्या पश्चिमेकडील पर्वतीय भागातील चांगपिंग लाइनवर गुरुवारी संध्याकाळी हा अपघात झाला. शहराच्या परिवहन प्राधिकरणाने शुक्रवारी त्यांच्या सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ट्रेन अचानक रुळांवर घसरल्यामुळे पुढे जाणारी ट्रेन स्वतःहून थांबली. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रेनला वेळेत ब्रेक लावता आला नाही आणि ती घसरली. आपत्कालीन वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि वाहतूक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि रात्री 11 च्या सुमारास सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. शुक्रवारी सकाळपर्यंत सर्व जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बीजिंगमध्ये बुधवारी असामान्यपणे जोरदार हिमवर्षाव सुरू झाला, ज्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आणि शाळा बंद करण्यात आल्या. तर हवामान विभागाने शहरात आणखी बर्फवृष्टीचा होण्याचा इशारा दिला आहे. रात्रभर तापमान उणे 11 अंश सेल्सिअसच्या खाली राहिले. उत्तर चीनमध्ये बर्फाच्या वादळामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.