किव्ह : रशिया-युक्रेन (Russia-Ukraine War) सुरू आहे. त्यातच युक्रेनने भारताच्या तेल खरेदीविषयी (Oil Purchase) संताप व्यक्त केला. भारताचे कृत्य हे नैतिकदृष्ट्या चुकीचे असल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे भारताच्या तेल खरेदीवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भारत कमी किमतीत रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि त्यावरुनच युक्रेनने आता भारतावर निशाणा साधला. मात्र आपण स्वतःचे हित आधी पाहू, असे आधीच भारताने स्पष्ट केले होते. पण तरीही युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा (Dmytro Kuleba) यांनी हे कृत्य नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे सांगितले. आम्ही दररोज मरतोय आणि भारत स्वस्तात तेल खरेदी करण्याची संधी घेत आहे, अशा शब्दात दिमित्रो यांनी संताप व्यक्त केला.
दिमित्रो कुलेबा यांनी रशियातून स्वस्त तेल घेण्याच्या भारताच्या भूमिकेवर टीका केली आहे. भारताने युक्रेनकडे मानवतावादी (Humanism) दृष्टिकोनातून पाहावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) युद्ध संपवण्यासाठी मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, या विषयावर आवाज उठवून भारताचे पंतप्रधान बदल घडवून आणू शकतात, असा विश्वासही युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.