सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आणखी एकाला पुण्यातून अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कर्वेनगर भागातून त्याला पकडले. याप्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक केली असून, मुख्य सूत्रधार शुभम लोणकर अद्याप फरार आहे. गौरव विलास अपुणे (वय २३, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अपुणेला अटक केल्याचे समजताच पुणे पोलिसांनी यासंदंर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच्यावर यापुर्वी गुन्हे दाखल नसल्याचे समोर आले आहे. अपुणेच्या काही साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हत्या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक केली.
वारजे भागातील शुभम लोणकर हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हत्येचा कट पुण्यात रचला गेला. शुभमचा भाऊ प्रवीणला अटक केल्यानंतर शुभम लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल यांच्या संपर्कामध्ये होता. त्याला बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अकोला पोलिसांनी जानेवारी महिन्यात अटक केली होती. या गुन्ह्यात तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता.
कारागृहातून बाहेर आल्यावर तो पुन्हा बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला. त्यावेळी अनमोल बिष्णोईने त्याला सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली. काही रक्कम त्याला आगाऊ देण्यात आली होती, तसेच त्याला आणखी पैसे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार शुभमने अन्य तिघा आरोपींशी संगनमत करून या हत्येचा कट रचला. १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे भागात सिद्दिकी यांची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली गेली.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील ‘या’ हायप्रोफाइल केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, जामीन फेटाळल्यामुळे आरोपीची अटक निश्चित
१२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडल्या
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुंबईतील नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून बाबा सिद्दिकी बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांत त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या. रात्रीच्या अंधारात पसार झालेल्या आरोपींपैकी दोघांच्या पोलिसांनी शिताफीनं मुसक्या आवळल्या. पण तिसऱ्या आरोपीनं अंधाराचा आणि गोंधळाचा फायदा घेत तिथून पोबारा केला. मात्र, एका फोटोमुळे पोलिसांना आरोपींची ओळख आणि या सगळ्या कारस्थानाचा छडा लागला.
कोण होते बाबा सिद्दीकी ?
बाबा सिद्दीकी हे केवळ राजकारणीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांचं नाव प्रसिद्ध होतं. दरवर्षी त्यांची इफ्तार पार्टी ही चर्चेत असते. या पार्टीसाठी फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नव्हे तर छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्सही शामिल होतात. शाहरूख खान, सलमान खान हेही आवर्जून सिद्दीकी यांच्या पार्टीत शामिल होतात. सलमान खान याचे बाबा सिद्दीकीशी जवळचे संबंध होते. दरवर्षी त्यांच्या इफ्तार पार्टीची सोशल मीडियावर मोठी चर्चा असते, फोटो, व्हिडीओ गाजत असतात. ज्यांच्या पार्टीसाठी स्टार्स आवर्जून येतात, असे हे बाबा सिद्दीकी होते.
काँग्रेसच्या एका जुन्या नेत्यांपैकी एक असलेले बाबा सिद्दीकी बॉलिवूडमध्येही लोकप्रिय होते. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ते काँग्रेसशी जोडले गेले. त्यानंतर त्यांनी अनेक आंदोलनांतही सहभग घेतला होता. त्यांनी मुंबईतील एमएमके कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बाबांनी दोनदा नगरसेवक म्हणून काम पाहिले. यानंतर ते तीनवेळा काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेत आमदारही झाले.