Venezuela Earthquake : भूकंपाचा तेल विहिरींवर किती परिणाम झाला? व्हेनेझुएलामधील विध्वंसामुळे प्रश्न निर्माण होतात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Venezuela earthquake 2026 oil wells impact : दक्षिण अमेरिकेतील प्रमुख देश असलेल्या व्हेनेझुएलाधून अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या एका अत्यंत विनाशकारी भूकंपामुळे संपूर्ण देश हादरला असून प्राथमिक अंदाजानुसार तब्बल १० हजारांहून अधिक निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा आकडा येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. या भीषण मानवी जीवनाचा संकटासोबतच आता आणखी एका मोठ्या चिंतेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हेनेझुएला हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा (Crude Oil) साठा असलेला देश आहे. या भूकंपामुळे तिथल्या हजारो तेल विहिरींचे काय झाले? या विहिरींना धक्का लागल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि पर्यावरणावर याचे काय परिणाम होतील? या प्रश्नांनी आता जगभरातील तज्ञांना चक्रावून सोडले आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर, भूकंप म्हणजे जमिनीच्या अत्यंत खोल भागामध्ये साठलेली ऊर्जा अचानक स्फोटाच्या स्वरूपात बाहेर पडणे होय. ही ऊर्जा जेव्हा लहरींच्या (Seismic Waves) रूपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते, तशी जमीन तीव्रतेने डोलू लागते. या प्रक्रियेत वर बांधलेल्या मोठमोठ्या इमारती, पूल जितके असुरक्षित असतात, तितक्याच जमिनीच्या आत हजारो फूट खोल खोदलेल्या तेलाच्या विहिरीसुद्धा अत्यंत संवेदनशील आणि धोक्यात असतात. व्हेनेझुएलामध्ये एकूण ३०,००० पेक्षा जास्त तेल विहिरी आहेत, ज्यापैकी ८,५०० विहिरी सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहेत आणि त्यावर ९०,००० पेक्षा जास्त कामगारांचे जीवन अवलंबून आहे. या भूकंपामुळे या संपूर्ण यंत्रणेला मोठा तडा गेल्याची भीती आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : DNA Study : 100 वर्षे जगण्याचे रहस्य सापडले! 316 वर्षे जगणाऱ्या ब्राझीलच्या तीन बहिणींच्या डीएनएवर शास्त्रज्ञांचे मोठे संशोधन
भूकंपामध्ये दोन प्रकारच्या मुख्य लहरी जमिनीखालून प्रवास करतात, ज्या विहिरींच्या संरचनेला थेट हानी पोहोचवतात. यात पहिली असते ‘पी-वेव्ह’ (Primary Wave). ही लहर ध्वनीच्या वेगासारखी धावते आणि घन तसेच द्रव (तेल आणि पाणी) अशा दोन्ही माध्यमातून सहज पार होते. ही विहिरींसाठी सुरुवातीला एक सौम्य धक्का असते. परंतु, यानंतर येणारी ‘एस-वेव्ह’ (Secondary Wave) अत्यंत विनाशकारी मानली जाते. ही लहर फक्त घन माध्यमातून प्रवास करू शकते आणि द्रव पदार्थात पोहोचताच नाहीशी होते. परंतु, घन जमिनीला ती ज्या प्रकारे उजवीकडे-डावीकडे किंवा वर-खाली हलवते, त्यामुळे जमिनीखालील तेल विहिरींच्या पाईप्सवर आणि स्टीलच्या आवरणावर (Casing) प्रचंड दबाव येतो आणि ते जागच्या जागी वाकतात किंवा तुटतात.
तेलाची विहीर प्रामुख्याने तीन भागांत विभागलेली असते वरचे तोंड (Wellhead), जमिनीखालील स्टीलचे आवरण व सिमेंटिंग, आणि सर्वात खालचा प्रॉडक्शन झोन. भूकंपामुळे जेव्हा जमीन हलते, तेव्हा विहिरीचे सिमेंटिंग सैल होते. यामुळे जमिनीखालील विविध थरांमधील तेल आणि पाण्याचे मार्ग अनपेक्षितपणे बदलतात. काही वेळा छिद्रांमधील (Pores) दाब अचानक वाढतो, ज्यामुळे तेलाचा नैसर्गिक प्रवाह थांबतो किंवा तो चुकीच्या दिशेने वाहू लागतो. याचा थेट परिणाम तेल उत्पादनावर होतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : CITIC टॉवरवर विमान कोसळले अन् पुरावेच नष्ट केले! Chinaच्या ‘सायबरस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळजनक कारनामा
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे निर्माण झालेला सर्वात मोठा धोका म्हणजे ‘मृदेचे द्रवीकरण’ (Soil Liquefaction). जेव्हा पाण्याने युक्त वालुकामय मातीवर भूकंपाचे तीव्र धक्के बसतात, तेव्हा ती माती एखाद्या द्रवासारखी (Liquid) वागू लागते. अशा स्थितीत विहिरीचा पाया मजबूत राहू शकत नाही आणि संपूर्ण विहीर आतून कोसळते. याशिवाय, विहिरीचे तोंड (Wellhead) बाजूला सरकल्यामुळे अंतर्गत पाईपलाईन फुटतात. जर हाय-प्रेशर झोनमधील व्हॉल्व्ह खराब झाले, तर विहिरीतून अचानक तेल आणि वायूचा प्रचंड मोठा स्फोट होऊन कारंजे उडू शकतात, ज्याला तांत्रिक भाषेत ‘ब्लोआउट’ (Blowout) म्हणतात.
हा ब्लोआउट केवळ आर्थिक नुकसान करत नाही, तर यामुळे आसपासच्या परिसरात विषारी वायू पसरतात. तेल गळतीमुळे जमिनीखालील पाण्याचे साठे आणि शेतजमीन कायमची नापीक होण्याचा धोका असतो. भूकंपामुळे लागणाऱ्या आगी विहिरींच्या क्षेत्रात पसरल्यास शेकडो कामगारांचा जीव धोक्यात येऊ शकतो. व्हेनेझुएलामध्ये आधीच गरिबी आणि राजकीय अस्थिरतेमुळे पायाभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत तिथल्या ऑपरेटरकडे आधुनिक देखरेख उपकरणे जसे की, टिल्ट गेज, फायबर-ऑप्टिक मॉनिटरिंग किंवा स्वयंचलित शट-इन प्रणाली (Automatic Shut-in Valves) उपलब्ध असणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे या विहिरींचे नेमके किती नुकसान झाले आहे, याचे मूल्यांकन करण्यास सरकारी यंत्रणांना बरेच महिने लागतील, अशी चिन्हे आहेत.






