कोण आहे नेदरलॅंडचे रॉब जेटन ? जे बनू शकतात जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान...
नेदरलँड्सच्या राजकीय इतिहास घडवण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे डच सेंट्रिस्ट पक्षाचे D66 चे 38 वर्षीय नेते रॉब जेटन हे नेदरलँडचे पहिले उघडपणे समलैंगिक आणि सर्वात तरुण पंतप्रधान बनू शकतात. अशी चर्चा आहे. नेदरलँडमध्ये 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रॉब जेटन यांच्या त्यांच्या पक्ष D66ने मोठा विजय मिळवला.
या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना रॉब जेटन म्हणाले, “या निवडणुकीत आपण सर्वात मोठा पक्ष बनलो आहोत याचा मला खूप आनंद आहे. D66 साठी हा एक ऐतिहासिक निकाल आहे, परंतु त्यासोबत एक मोठी जबाबदारी येते.”नेदरलँड्समधील अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत प्रगतिशील पक्षाचे नेते रॉब जेटन यांनी इस्लामविरोधी भूमिकेसाठी ओळखले जाणारे गीर्ट वाइल्डर्स यांचा पराभव केला.
वाइल्डर्स यांनी या निवडणुकीत स्थलांतराला विरोध, तसेचमकेला होता. मात्र, त्यांच्या या भूमिकेला मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांच्या लोकप्रियतेत लक्षणीय घट झाल्याचे सर्वेक्षणांमधून दिसून आले आहे. जेटन यांच्या विजयाला नेदरलँड्सच्या राजकारणात उदारमतवादी आणि समावेशक राजकारणाला मिळालेला पाठिंबा म्हणून पाहिले जात आहे.
नेदरलँड्समधील निवडणुकीचे अंतिम निकाल ३ नोव्हेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत, जेव्हा परदेशात राहणाऱ्या डच नागरिकांची मते मोजली जातील. सध्या मिळालेल्या निकालांनुसार D66 पक्षाचे नेते रॉब जेटन यांनी इस्लामविरोधी नेता गीर्ट वाइल्डर्स यांचा पराभव करत निर्णायक आघाडी घेतली आहे. जेटन यांनी प्रचारादरम्यान सकारात्मक आणि समावेशक विचारसरणीवर भर दिला. त्यांच्या मते, “सकारात्मक विचारसरणीमुळे लोकलहरींना पराभूत करता येते.”
दोन वर्षांपूर्वीच D66 पक्ष देशात पाचव्या स्थानावर होता. परंतु जेटन यांच्या रणनीती, संयमित नेतृत्व आणि उदारमतवादी भूमिकेमुळे पक्षाला सत्तेच्या शिखरावर पोहोचवण्यात यश मिळाले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रसिद्ध घोषवाक्य “Yes, We Can” वरून प्रेरणा घेत, जेटन यांनी आपल्या प्रचारासाठी “हे शक्य आहे” (It’s Possible) हे घोषवाक्य निवडले — आणि त्यांच्या या सकारात्मक संदेशाने मतदारांच्या मनावर ठसा उमटवला.
त्यांनी गीर्ट वाइल्डर्सवर “समाजात द्वेष आणि फूट पसरवण्याचा” आरोप केला. जेटन म्हणाले, “आम्ही युरोप आणि जगाला दाखवून दिले आहे की जर तुम्ही तुमच्या देशासाठी सकारात्मक संदेश घेऊन गेलात तर लोकप्रियतावादी शक्तींचा पराभव होऊ शकतो.” मला नेदरलँड्सला युरोपच्या मध्यभागी परत आणायचे आहे.
जेटन म्हणाले, “आम्ही एक अतिशय सकारात्मक मोहीम चालवली कारण गेल्या काही वर्षांत नेदरलँड्समध्ये बरीच नकारात्मकता निर्माण झाली आहे. आता ते वातावरण बदलण्याची वेळ आली आहे. मला नेदरलँड्स पुन्हा युरोपच्या केंद्रस्थानी हवे आहे, कारण युरोपियन सहकार्याशिवाय आपण काहीच नाही.”
नेदरलँड्सचे उदयोन्मुख नेते रॉब जेटन हे केवळ राजकारणातील नव्या विचारांचे प्रतीक नसून त्यांच्या वैयक्तिक जीवनातील साधेपणा आणि संवेदनशीलता यांमुळेही चर्चेत आहेत.
रॉब जेटन यांचा जन्म आग्नेय नेदरलँड्समधील उडेन या शहरात झाला. त्यांच्या दोन्ही पालकांचा व्यवसाय शिक्षकाचा होता. लहानपणापासूनच त्यांना फुटबॉल आणि अॅथलेटिक्सची आवड होती. त्यांनी निमेगेन येथील रॅडबॉड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासन(Public Administration) या विषयात शिक्षण घेतले. “मला नेहमीच जग थोडं चांगलं बनवायचं होतं,” असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.
तरुणपणी जेटन यांना खेळ किंवा हॉटेल व्यवसायात करिअर करायचे होते. विनोदाने ते सांगतात, “मला एका उबदार देशात समुद्रकिनाऱ्यावर माझं स्वतःचं रेस्टॉरंट उघडायचं होतं. पण आयुष्याने मला वेगळ्या मार्गावर नेलं. आता मात्र मी नक्कीच म्हणू शकतो की नेदरलँड्समध्ये माझी सर्वात सुंदर नोकरी आहे.”
राजकारणाइतकेच रॉब जेटन यांच्या आयुष्यात प्रेमही तितकंच सुंदर आहे. त्यांचे अर्जेंटिनाचे प्रसिद्ध हॉकीपटू निकोलस कीनन यांच्याशी लग्न झाले आहे. येत्या वर्षी हे दोघे स्पेनमध्ये औपचारिक विवाह सोहळा पार पाडणार आहेत. रॉब जेटन यांचे आयुष्य हे सकारात्मक विचार, प्रामाणिकता आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण मानले जाते — आणि कदाचित म्हणूनच ते आज नेदरलँड्सच्या नव्या पिढीचे आवडते नेते ठरले आहेत.






