चिकन नीट शिजलं नाही म्हणून सासरच्या लोकांची क्रूरता, इमारतीतून सुनेला फेकलं खाली; पिडितेची प्रकृती गंभीर!

पाकिस्तानातील लाहोरमध्ये या विवाहितेला तिच्या सासरच्या लोकांनी इमारतीबाहेर फेकले. असं करण्याच्या मागचं कारण म्हणजे त्यांच्या सुनेनं चिकन निट शिजवलं नव्हत त्यामुळे त्यांनी तिला इतकी कठोर शिक्षा दिली.

  इंटरनेटवर रोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल (viral video) होतात. काही मजेशीर असतात तर काही संतापजनक असतात. सध्या पाकिस्तानमधून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला इमारतीवरुन खाली पडताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेनं चिकन निट न शिजवल्याने तिच्या सासरच्यांनी तिला इमारतीबाहेर फेकल्याचं सांगण्यात येत आहे. वरुन पडल्याने महिला गंभीर जखमी झाली असून सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ पाहून मात्र, नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

  नेमका प्रकार काय

  मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ पाकिस्तानमधील आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये या विवाहितेला तिच्या सासरच्या लोकांनी इमारतीबाहेर फेकले. असं करण्याच्या मागचं कारण म्हणजे त्यांच्या सुनेनं चिकन निट शिजवलं नव्हत त्यामुळे त्यांनी तिला इतकी कठोर शिक्षा दिली. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला जोरजोरात ओरडते आणि थेट रस्त्यावर पडते. महिला पडल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक बाहेर आले आणि महिलेला उचलण्याचा प्रयत्न केला आणि तिला रुग्णालयात नेलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी महिलेचा पती, सासू शाजिया आणि तिचा मेहुणा रोमन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तपास सुरू केला आहे.

  महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय

  पीडितेच्या घरातून होणारा गोंधळ ऐकून एक लहान मुलगी तिच्या घराचा दरवाजा उघडते, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. वर पाहिलं तर ती महिला आरडाओरड करत इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडताना दिसली. मुलगी ताबडतोब तिच्या घराच्या आत धावते आणि दरवाजा बंद करते. काही वेळाने ती महिला जमिनीवर पडली, त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली.आजूबाजूच्या लोकांनी महिलेचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळाकडे धाव घेतली.

  व्हिडिओमध्ये, जखमी महिलेला मदत करताना आणि पोलिसांना कॉल करताना जवळचे लोक ऐकू येतात. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांना या महिलेने सासरच्या लोकांच्या कथित वागणुकीमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असा संशय व्यक्त केला आहे.