Phulwara Movie: झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ या आगामी मराठी चित्रपटाची प्रेक्षकांमधील उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर प्रदर्शित झाला. यात अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांचा लावणीसाज पाहायला मिळाला. पारंपरिक लावणीचा डौल, नजाकतदार अदाकारी आणि देखणा साजशृंगार यामुळे त्यांच्या या नव्या रूपाची सध्या चर्चा रंगली आहे. आता या दोघींनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देत महाराष्ट्राच्या अस्मितेला मानवंदना दिली.
चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथील स्मारकाला भेट दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा साक्षीदार असलेला हुतात्मा चौक हा मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो. या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन दोघींनी मानवंदना अर्पण केली.
त्यांची ही भेट केवळ ऐतिहासिक स्थळाला दिलेली भेट न राहता, ‘फुलवरा’मधील लावणीच्या विश्वाशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे नाते जोडणारी ठरली.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोककलेचे महत्त्वपूर्ण योगदान
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांसारख्या शाहिरांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनजागृती केली. लोककलेच्या सामर्थ्याने मराठी अस्मितेचा जागर घडवणाऱ्या या परंपरेत लावणी, तमाशा आणि लोकनाट्य यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
हुतात्मा चौकाच्या ऐतिहासिक स्मृती आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा समृद्ध वारसा यांचा सुंदर संगम वैदेही आणि प्रियदर्शिनी यांच्या भेटीतून पाहायला मिळाला. लावणी ही केवळ नृत्यकला नसून तिच्या प्रत्येक अदाकारीत मराठी मातीचा ठसका, कलावंतांची मेहनत आणि परंपरेचा अभिमान सामावलेला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळावर दोघींच्या लावणीसाजाची उपस्थिती त्यांच्या आगामी भूमिकांना एक वेगळा सांस्कृतिक संदर्भ देणारी ठरली.
‘फुलवरा’ या चित्रपटाच्या माध्यमातून लावणीच्या विश्वातील रंग, संघर्ष आणि कलावंतांचा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्यासोबत आणखी कोणते कलाकार या चित्रपटात दिसणार, तसेच चित्रपटाची नेमकी कथा काय असणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता चित्रपटाच्या पुढील झलक आणि अधिकृत घोषणांकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.