पुण्यात उभा राहणार जलशुद्धीकरण प्रकल्प (फोटो- istockphoto/सोशल मिडिया) 
पुणे

Pune GBS Update: पुण्याच्या 'या' भागात उभा राहणार जलशुद्धीकरण प्रकल्प; 'जीबीएस'च्या पार्श्वभूमीवर निर्णय

महापालिकेने खडकवासला येथील जलसंपदाच्या जागेवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठीचे पूर्वगणनपत्रक (एस्टिमेट) तयार करण्याचे काम सुरू आहे.

तेजस भागवत

पुणे: सिंहगड रस्ता (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) वाढलेल्या गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या खडकवासला परिसरात महापालिकेकडून १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून प्रकल्पाच्या जागेसाठी महापालिकेकडून जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या नांदेड, नांदोशी, किरकटवाडी आदी भागांना नांदेड तसेच धायरीतील बारांगणी मळा येथील विहिरींमधून पाणीपुरवठा केला जातो. खडकवासला धरणातून बंदिस्त जलवाहिनीतून येणारे प्रक्रिया न केलेले पाणी (रॉ वॉटर) या विहिरीत सोडले जाते. त्यानंतर या विहिरींमध्ये केवळ ब्लिचिंग पावडर टाकून हे पाणी संबंधित गावांना वितरित केले जात होते. सिंहगड रस्ता परिसरात मागील दीड महिन्यापासून दुषीत पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जीबीएस आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महापालिकेने येथील विहिरींवर ‘क्लोरिनेशन’ची यंत्रणा बसवली.

या पार्श्वभूमीवर या गावांसाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची मागणी केली जात होती. पूर्वी या गावांसाठी महापालिकेच्या वडगाव बुद्रुक येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याने उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या गावांच्या परिसरातच जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते. या प्रकल्पासाठी जागा देण्याचे जलसंपदा विभागाने या बैठकीत मान्य केले होते. त्यासाठी पाचशे कोटी रुपये निधी देण्याचेही जाहीर केले होते.

त्यानुसार महापालिकेने खडकवासला येथील जलसंपदाच्या जागेवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठीचे पूर्वगणनपत्रक (एस्टिमेट) तयार करण्याचे काम सुरू आहे. पूर्वगणन समितीच्या पुढील बैठकीत हे पूर्वगणनपत्रक मान्यतेसाठी सादर केले जाईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल, ’असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या नांदेड, नांदोशी, किरकटवाडी, डीएसके विश्व, नऱ्हेचा काही भाग आणि लगतच्या परिसराला प्रक्रिया न केलेले पाणी (रॉ वॉटर) दिले जाते. मात्र, जीबीएसच्या पार्श्वभूमीवर या गावांसाठीही खडकवासला येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याचे काम लवकरच सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका.

Food tips: डार्क चॉकलेटचे किती प्रकार आहेत? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे!

Banks Offer : इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात कमाईची मोठी संधी! Charging स्टेशनसाठी बँकांनी उघडला खजिना! मिळणार 10 कोटींचा निधी

Kalatmak Rajyog: डिसेंबरच्या सुरुवातीला कलात्मक योगाचा प्रभाव; कर्क राशीसह या राशींच्या लोकांना मिळणार करिअरमध्ये मोठे यश

Fashion: महाराष्ट्रीयन साड्यांचे आहेत अनेक प्रकार; पैठणीपासून नऊवारीपर्यंत जाणून घ्या प्रत्येक साडीची खासियत!

Vaibhav Sooryanvanshi: ६ संघाच्या एकत्रित सिक्स वैभवच्या नावे, पाकिस्तानची तंतरली; वैभव सूर्यवंशीची दहशत