मध्यप्रदेशात अग्नितांडव; फटाकांच्या कारखान्यात भीषण स्फोट, शेकडो लोक जखमी

मध्यप्रदेशमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील हरदा येथील मगरडा रोडवरील बैरागड रेहता येथील एका फटाक्यांच्या कारखान्यात प्रचंड मोठी आग लागली आहे.

    मध्यप्रदेश : मध्यप्रदेशमधून (MP) धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील हरदा येथील मगरडा रोडवरील बैरागड रेहता येथील एका फटाक्यांच्या कारखान्यात प्रचंड मोठी आग (Bairagarh  Rehta Fireworks Factory Fire) लागली आहे. यावेळी मोठमोठ्या स्फोटांचे आवाज देखील आले. यामुळे आसपासच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आत्तापर्यंत किमान 100 लोक जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

    मध्य प्रदेशमधील फटाक्यांच्या कारखान्याला लागलेली आग इतकी भीषण होती की यामुळे आसपासच्या इमारतींना देखील धक्का बसला. तसेच काही इमारती आगीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये कोसळल्या देखील आहे. अद्यापही कारखान्यातील अनेक ठिकाणी स्फोट होत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून पोलिसांचा फौजफाटा देखील कार्यरत आहे. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून यामध्ये मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमी आणि मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही देखील समावेश आहे.

    अनेक किलोमीटरपर्यंत भूकंप सदृश स्थिती

    फटाक्यांच्या कारखान्याला आग लागल्यानंतर जोरात स्फोट झाले. सुमारे 10 ते 15 मोठे स्फोट झाले. अनेक किलोमीटर अंतरापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. अग्निशमन दलाच्या पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र स्फोटामुळे आग पसरली. त्यामुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.