फोटो सौजन्य: istock
भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कार खरेदी करणे हे अजूनही एक मोठे स्वप्न असते. परंतु जर तुम्हाला स्वस्त कार खरेदी करायची असेलच, तर भारतातील कोणत्या शहरांमध्ये ती खरेदी करून तुम्ही खूप बचत करू शकता त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
खरं तर, जेव्हा आपण कार खरेदी करतो तेव्हा त्याच्या ऑन-रोड किमतीत केवळ कारची एक्स-शोरूम किंमतच समाविष्ट नसते, तर इतर अनेक चार्जेस देखील जोडले जातात – जसे की जीएसटी, रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन फी आणि इंश्युरन्स. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये हे सर्व चार्जेस वेगळे आहेत, ज्यामुळे एकाच कारची किंमत सर्वत्र वेगळी दिसते.
देशातील काही शहरांमध्ये कार खरेदी करताना रोड टॅक्स कमी असल्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत मोठी रक्कम वाचवता येते. या यादीत सर्वात वर आहे शिमला – हिमाचल प्रदेशची राजधानी. येथे कारवर फक्त 2.5% ते 3% रोड टॅक्स आकारला जातो, जे दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये लागणाऱ्या 7% ते 12% रोड टॅक्सच्या तुलनेत खूपच कमी आहे. उदाहरणार्थ, 5 लाख रुपयांच्या कारवर शिमलामध्ये फक्त 12,500 ते 15,000 रुपये टॅक्स लागतो, तर दिल्लीसारख्या शहरात याच कारसाठी 35,000 रुपयांपर्यंत टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे ग्राहकांना सरासरी 20 ते 25 हजार रुपयांची बचत शक्य होते.
पुडुचेरी हे दुसरे ठिकाण आहे जेथे कार खरेदी करणे किफायतशीर ठरते. हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे येथे 4% ते 6% दरम्यान रोड टॅक्स आहे. अशा ठिकाणी 6 ते 7 लाख रुपयांची कार दिल्ली किंवा मुंबईपेक्षा 50 ते 70 हजार रुपयांनी स्वस्त मिळू शकते.
हे दोन्ही शहरं उत्तरेतील किफायतशीर पर्याय आहेत. चंदीगडमध्ये रोड टॅक्स 3% ते 6%, तर गुरुग्राममध्ये 5% ते 10% दरम्यान आहे. दोन्ही ठिकाणे दिल्लीजवळ असल्यामुळे कार खरेदी करून रजिस्ट्रेशन करणे अधिक सोयीचे आणि फायदेशीर ठरते.
ईशान्य भारतातील गंगटोक (सिक्कीमची राजधानी) हे आणखी एक शहर आहे जिथे कार खरेदी करताना मोठी बचत होऊ शकते. येथे रोड टॅक्स खूप कमी असून, रजिस्ट्रेशन प्रक्रिया देखील सुलभ मानली जाते. इथे कार खरेदी केल्यास दिल्ली किंवा बेंगळुरूच्या तुलनेत 25 ते 35 हजार रुपये वाचू शकतात.
दुसरीकडे, दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू ही मोठी शहरे कार खरेदीसाठी महागड्या मानली जातात. येथे रोड टॅक्स अनुक्रमे 7% ते 10% (दिल्ली), 10% ते 12% (मुंबई) आणि 10% ते 13% (बेंगळुरू) पर्यंत असतो. त्यामुळे, 5 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीच्या कारची ऑन-रोड किंमत या शहरांमध्ये 5.5 ते 6 लाख रुपये होते. मात्र, शिमला, पुडुचेरी किंवा चंदीगडमध्ये तीच कार 5 ते 5.3 लाखांमध्ये मिळू शकते, जेणेकरून तुम्ही किमान 50 हजार रुपयांची बचत करू शकता.