भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव 'बेस्ट'ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी
मुंबई : भांडुप (पश्चिम) येथील स्टेशन रोडवर एक मोठा बस अपघात झाला. बेस्टच्या बसने अनेक लोकांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. हा अपघात सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास झाला. यातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून, याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिस उपायुक्त (डीसीपी) घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, भांडुपमधील स्टेशन रोडवर रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई पोलिस झोन ७ चे डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले की, अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले आहेत. आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : Karnataka Bus Accident : कर्नाटकमध्ये ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात; आगीत होरपळून 10 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू
या अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (एमएफबी), स्थानिक पोलिस, बेस्ट बस कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा यांसह अनेक आपत्कालीन यंत्रणांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. सुरुवातीच्या अहवालात असे दिसून आले आहे की या घटनेत १० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींची नेमकी संख्या आणि अपघाताविषयी अधिक माहिती घेतली जात आहे.
कुर्ल्यातील ‘त्या’ आठवणी पुन्हा ताज्या
गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी अशीच एक घटना घडली. यामध्ये इलेक्ट्रिक बेस्ट बस अनेक पादचाऱ्यांना आणि अंदाजे २२ वाहनांना धडकली. कुर्ला येथील एसजी बर्वे मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरकडे जाणाऱ्या सिमेंटच्या गेटला धडकली. ही बस थांबण्यापूर्वी सुमारे २०० मीटर धावत राहिली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि ४२ जण जखमी झाले.
काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातही बस अपघात
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील गोरलाथू गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली. गुरुवारी (दि.25) सकाळी राष्ट्रीय महामार्ग ४८ वर एका खाजगी बसला ट्रकने धडक दिली. ट्रॅव्हल बसच्या झालेल्या अपघातानंतर बसला आग लागल्याने १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. खाजगी स्लीपर कोच बस गोकर्णहून शिवमोगा येथे जात होती. धडकेनंतर बसने पेट घेतला, ज्यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, आत्तापर्यंत यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला.






