परिस्थितीशी संघर्ष करुन जगात भारताचे नावलौलिक गाजविणारी जुलेखा.. वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी तिला अपघात झाला. अनाथ जुलेखावर उपचार सुरु असताना ती स्वमग्न असल्याचं कळलं. हॉस्पिटलमधून तिची रवानगी एका संस्थेत झाली. पण तिचं वागणं, बोलणं, चालणं मुख्यत्वे स्वमग्न असल्याचा त्या संस्थेला त्रास होऊ लागला. एक, दोन, चार संस्था बदलल्या अखेर २०१२ मध्ये तिला पुण्याच्या अनिकेत सेवाभावी संस्थेत आणलं. संस्थेने तिच्या आवडीनिवडी जोपासत तिचे सुप्तगुण, खेळाची आवड लक्षात घेऊन मेहनत घेतली. जुलेखानेही त्यांची मेहनत सार्थ ठरवत डान्स, धावणे, गोळाफेक, लांब उडी, फ्लोअर गेम, मॅरेथॉन अशा विविध स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसं मिळविली. २०१९ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतात हॉलीबॉल संघात तिची निवड झाली. जुलेखा दुबईला पोहोचली. फक्त पोहोचली नाही तर हॉलीबॉल स्पर्धेत तिने ब्राँझ पदक जिंकत भारताचा तिरंगा फडकाविला. जुलेखाच्या या यशाची खरी मानकरी आहे जुलेखासारख्या ५५ अनाथ मतीमंद मुला मुलींचा सांभाळ करणारी कल्पना वर्पे…
जीवनाशी मी आता लढणार आहे
दुःख काळाआड दडणार आहे ।।
संगमनेर तालुक्यातील कनोली गावी कल्पना वर्पे यांचा जन्म शेतकरी कुटूंबात झाला. पाच बहिणी आणि एक भाऊ असा परिवार. मध्यमवर्गीय परिस्थितीतही वडील चांगदेव आणि आई विमल कधी डगमगले नाहीत. मुलींना उच्च शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ठरवलं की, मुलींना उच्च शिक्षण द्यायचे. पण, परिस्थितीमुळे वयाच्या १७ व्या वर्षीच सविता आणि कल्पनाचं लग्न एकाच मांडवात लावलं. लग्नाची नव्याची नवलाई सुरु होती. एक वर्षानंतर निकिताचा, तर दुसऱ्या वर्षी अनिकेतचा जन्म झाला. इथेच कल्पनाच्या आयुष्याने खाचखळग्याच्या रस्त्यावर प्रवेश केला.
अनिकेत वाढत होता पण त्याची बौध्दक क्षमता कमी होती. डॉक्टरांची उपचारादम्यान तो १०० टक्के मतिमंद असल्याचे निदान केले. तरीही त्यांनी धीर सोडला नाही. तीन वर्ष होत आली होती. अनिकेतमध्ये काहीच फरक नव्हता. हा संपूर्ण दिव्यांग आहे. त्याचा आपल्याला त्रास होईल. लोक हसतील.. याला कोठेतरी बाहेर ठेवले पाहिजे. ही घरच्यांची भुणभूण सुरु झाली होती. त्याच्यामुळे घरात भांडणं होत होती. नातेवाईकही लग्नसमारंभ, घरगुती समारंभाला बोलावण्याचं टाळत होते. वयाच्या आठव्या वर्षी त्याला शाळेत टाकायचं ठरवलं. पण, कुठल्याही शाळेत अॅडमिशन मिळत नव्हते. कारण तो १०० टक्के दिव्यांग होता. वय वाढत होतं. पण बौध्दिक वाढ नसल्यामुळे त्याला वेडा ठरवण्यात आलं. स्वत:च्या मुलाची ही हेळसाड सहन होत नव्हती. घरातली भांडणं थांबत नव्हतीच. अखेरीस दोन्ही मुलांना घेऊन घर सोडण्याचा निर्णय घेतला. निर्णय तर घेतला पण पुढे काय हा प्रश्न होताच…
कल्पनाने थेट शिर्डी गाठली. साईबाबांचे दर्शन घेतले आणि पुढचा प्रवास सुरु झाला. शिर्डीतच एका मतिमंद मुलांच्या केअरटेकर म्हणून काम मिळालं. त्याच शाळेत अनिकेतेलाही अॅडमिशन घेतले. शाळेतल्या मुलांचे कपडे धुणे, भांडी घासणे – धुणे, लादी पुसणे, केर काढणे अशी कामं करत करत जगण्याची धडपड सुरु होती. त्याच शाळेत मतीमंदासाठी स्पेशल डी. एडचा कोर्स सुरु झाला होता. नवउमेद निर्माण झाली. कल्पनाने या कोर्सला प्रवेश घेतला. एकीकडे अनिकेतचा सांभाळ, धुणी भांडीची कामं आणि दुसरीकडे कोर्सचा अभ्यास.. चिकाटी, मेहनत आणि अभ्यासूवृत्तीमुळे हा कोर्स चांगल्या मार्कांनी पास झाली. स्पेशल डी. एड झाल्यानंतर तिला पुण्यातल्या शिवणे येथील मतिमंद मुलांच्या शाळेत मुख्याध्यापिकेची नोकरी मिळाली… मुलांसह शिर्डीहुन पुण्यात आमगन झालं. वर्ष २०१०… २०१८ ला अनिकेतला १८ वर्ष पूर्ण झाली.. त्या जिथे होत्या त्या शाळेत १८ वर्षांवरील मुलांना रहाण्याची व्यवस्था नव्हती.. परवानगी नव्हती.. त्यातच शाळेच्या व्यवस्थापकांसोबत वारंवार खटके उडू लागले होते. पुन्हा एकदा आणिबाणीची परिस्थिती आली होती.नोकरी बस्स झाली. आता स्वतःची संस्था उभारायची हा धाडसी निर्णय घेतला आणि नोकरीचा राजीनामा दिला. जमलेल्या पैशातून शिवणे येथे एक फ्लॅट भाड्यानं घेतला. हा फ्लॅट काही स्वतःच्या मुलाकरता नव्हता.. तर हा फ्लॅट घेतला होता २४ मुला-मुलींसाठी… होय… शिवणे येथील शाळेत दहा वर्ष नोकरी केल्यानंतर कल्पनाने त्या मुला-मुलींवर आपला जीव ओवाळून टाकला होता. त्यातच त्यातील काहींनी वयाची १८ वर्ष पूर्ण केली होती. त्यामुळे ही मुलं त्या शाळेत राहू शकत नव्हती. तर, काहींनी कल्पनाच्या मातृत्वाची जाण ठेवत तिच्यासोबत शाळेबाहेर जाणं पसंत केलं. १८ वर्षांपुढील मुला-मुलींचा प्रश्न होता आणि त्याचवरुन शाळा व्यवस्थापकांशी तिचे खटके उडत होते. शेवटी त्या २४ मुला-मुलींना घेऊन तिने शाळा सोडली आणि तात्पुरता फ्लॅट घेऊन तिथे नवा संसार मांडला. नवा फ्लॅट, नवा संसार मांडत असतानाच अनिकेत सेवाभावी संस्थेची नोंदणी प्रक्रियाही चालू होती. शिवाय संस्थेसाठी जागा शोधणंही सुरु होतं. बावधन येथे रामनदीशेजारी भूगाव परिसरात मनासारखी जागा मिळाली. जागेचं भाडं १९ हजार शिवाय नव्या बांधकामासाठी लागणारं साहित्य हा खर्च न पेलवणारा होता. पण, चांगल्या कामाला लोकांचं नेहमी सहकार्य असतचं; त्यामुळे हा प्रश्नही निकाली लागला. एकदा मल्टीटेक कंपनीचे मालक अनिल घुबे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला भेट दिली. त्यांनी त्या चुटपुटीत मुलांना पाहिले आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. १८ वर्षांवरील ही दिव्यांग मुले आता महिन्याला १६ हजार रुपये कमवत आहेत. त्यातून संस्थेच्या भाड्याचा मोठा प्रश्न मिटला. मात्र, त्यातील काही पैसे दरमहा त्या मुलांच्या खात्यावरही जमा करण्यात येतात. आज संस्थेत ६ ते ४४ वयोगटातील ५२ मुले (२२ मुली, ३० मुले) आहेत. जुलेखा आज २२ वर्षांची आहे. तिने आजपर्यंत २२ मेडल आणि ७ ट्रॉफीज निरनिराळ्या स्पर्धेत जिंकल्या आहेत. तेथल्या लहान मुलांची ती आधार आहे. ही तिची प्रगती कल्पनासाठी खूप अभिमानास्पद आहे. कविता चांदोस्कर ही मतीमंद मुलगी भायखळा येथे फूटपाथवर २१ वर्षे आपल्या वडिलांसोबत राहिली. आईचे छत्र हरवलेलं. वडील दारुडे. ऊन, पाऊस, थंडी तिने फूटपाथवरच काढले. काही कळत नसल्यामुळे आहे तसं आयुष्य ती जगत होती. तेथल्या काही टॅक्सी ड्रायव्हरांनी कविताचं पुनर्वसन केलं. त्यावेळी अपेक्षा नसतानाही त्यांनी भरघोस मदत केली. रोख रक्कम, नव्या संस्थेसाठी लागणारं बरचसं सामान, धान्य अशी बरीच मदत केली. फुटपाथवरच्या त्या कविताला पहिल्यांदाच आयुष्यात छत काय असत ते जाणवलं. आज तिच्यात प्रगती पण खूप आहे. पुणे रेल्वेस्टेशनला एक मुलगा कोणीतरी सोडून दिला होता. त्यालाही एका फोनवर आधार दिला. त्याचं नावं स्वामी असं ठेवलं. अशा विशेष मुलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न म्हणून व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जातं. खेळाची आवड जोपासली जाते म्हणूनच की काय या मुलांनी आतापर्यंत ३४२ मेडल आणि ५३ ट्रॉफी मिळवल्या आहेत. लग्नानंतरच्या आयुष्यात छानसं कुटुंब असेल. मला ही त्याचा उपभोग घेता येईल. फार मोठं नाही पण मध्यमवर्गीय जीवन जगता येईल. परमेश्वरानं सासू, दीर, नवरा यांचं कुटूंब दिलं नसलं तरी अनेक मुलांची कल्पना आई झाली. अनेक कुटुंबांची कर्ताधर्ता झाली. सरकारकडून कोणतीही मदत न घेता समाजसेवेची जाण असणाऱ्या लोकांच्या सहकार्यामुळे आश्रमाचा कारभार चालू आहे. दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तुंचा प्रश्न भेडसावत असतोच. पण, परमेश्वरावर तिचा पूर्ण विश्वास आहे. या मुलांसोबत अखेरपर्यत जगायचं आणि आयुष्याची अखेर त्यांच्यासोबत असतानाच व्हावी ही तिची इच्छा आहे. परमेश्वरा, हे तू माझ्या वाट्याला का आणले? असा प्रश्न मनात न आणता ती म्हणते..
समजावूनी व्यथेला समजविता ना आले ।।
जगणे अखेर माझे मला टाळता न आले ।।
vidyampawar@gmail.com
विद्या पवार