गौरी म्हणजे गणेशाची आई. ती आपल्या माहेरी येते, अशी ती कल्पना. कोणत्याही स्त्रीसाठी माहेरी जाणं म्हणजे अतीव आनंदाचा सोहळा असतो. गौरीपूजन म्हणजे माहेरी आलेल्या मुलीचं आईने केलेलं कोडकौतुक. ते कौतुक सासरी गेलेली मुलगी स्वतःचं म्हणुनच अनुभवते आणि स्वतःचे लाड पुरवून घेते. म्हणून माहेरवासी स्त्रियांना गणपतीपेक्षा गौरीचं कौतुक अंमळ जास्त असतं. महाराष्ट्रात दर बारा कोसावर भाषा बदलत जाते, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रदेशानुसार, प्रांतानुसार प्रथापरंपरा तसेच गौरींच्या पूजेच्या पध्दतीही बदललेल्या दिसतात. शहरी आणि ग्रामीण भागातही आपापल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या प्रथेपरंपरेनुसार गौरीची पूजा केली जाते.
महाराष्ट्रातील विविध जाती, पोटजातीमध्ये गौरीपूजेची अशी भिन्नता असली तरी सर्वांच्याच मनातील भक्तिभावाची, श्रद्धेची भावना मात्र सारखीच असते. तीन दिवसाच्या या उत्सवात गौराईचा थाटमाट, तिची षोडशोपचारे पूजा, नैवेद्याला असलेली गोडधोडाची रेलचेल, नाचगाणी, झिम्मा फुगडी, ओवशाची लगबग, कुमारिका पूजन, हळदीकुंकू यांनी घर गजबजून जातं. माहेरपणाला आलेल्या गौरीला विविध पदार्थांचा नैवेद्य खाऊ घालून तिचे लाड पुरविले जातात. त्यामुळे या सर्वात समस्त महिलावर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे आपल्या लाडक्या गौराईच्या नैवेद्याचा थाट. कोकण पट्ट्यात आगमनादिवशी गौरी स्थानापन्न झाल्यावर तिची पूजा करून भाजीभाकरी तसेच कोणताही गोडाचा नैवेद्य केला जातो. तर गौरीपूजनाच्या दिवशी पाच प्रकारच्या भाज्या, वडे, काळ्या वाटाण्याचं सांबारं तसेच लापशीचा नैवेद्य दाखविला जातो. ग्रामीण भागात एकत्र कुटुंबात एकाच घरात अनेक बिऱ्हाडे असतात. या प्रत्येक बिऱ्हाडातून वेगवेगळा परंतु एकत्रितपणे नैवेद्य दाखविला जातो. प्रत्येक बिऱ्हाडातून आलेल्या या नैवेद्यात गुळखोबऱ्याच्या करंज्या किंवा कान्होले, लापशी, तांदळाची खीर, कडबोळी, पुरणपोळी, पातोळ्या, मोदक असा वेगवेगळा गोडाचा पदार्थ असतो.
कोकणात गौरी पूजनाच्या दिवशीच ‘गौरीचा ओवसा’ भरण्याची पद्धतही आहे. ओवसा हा ‘वसा’ ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. वसा म्हणजे व्रत. खास या ओवशासाठी माहेरवाशिणी एका वेगळ्याच ओढीने माहेरी येतात. समृद्धीचं प्रतीक असलेला गौरीचा फळाफुलांनी भरलेला हा सुपांचा ओवसा कोकणात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. गौरीचा हा सण म्हणजे जणू कौटुंबिक उत्सवच असतो. त्याच दिवशी रात्री गौरीला फलाहार दाखविला जातो. तसेच कोकणातच काही ठिकाणी तसेच अस्सल मालवणी घरात गौरीला तिखटाचा म्हणजे वडेसागुती, अळुवडीचा नेवैद्य दाखविण्याचीही प्रथा आहे. तर विसर्जनाच्यादिवशी भाकरी आणि शेगुलाच्या भाजीचा नैवेद्य दाखवून तिची पाठवणी केली जाते. घाटावर पहिल्या दिवशी भाजीभाकरी तर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा खास नैवेद्य केला जातो. विसर्जनाच्यादिवशी गौरीला दहीभाताचा नैवेद्य असतो. महाराष्ट्रात दर बारा कोसावर फक्त भाषाच नाही तर रितीभाती, पदार्थ बनविण्याच्या तसेच खाण्यापिण्याच्या पद्धतीही बदलतात.
कोकणातीलच वैश्यवाणी ज्ञातीतील स्नेहा गोवेकर म्हणाल्या, “आमच्याकडे नैवेद्याला पालक सोडून इतर पाचसहा पालेभाज्या एकत्रित करून त्याची भाजी आणि भाकरी केली जाते. तसेच गोड म्हणून पुरणपोळी केली जाते. गौरी पूजनादिवशी सगळी पीठ एकत्र करून त्यात गूळ आणि केळं घालून गौरीसाठी कायरोळे केले जातात. तर विसर्जनादिवशी गूळ खोबरं घालून केलेले सात काप्याचे घावणे केले जातात. “आगरी बांधवांमध्येही गौरीपूजनाच्या दिवशी गौरीला गोडधोडाबरोबर मांसाहाराचा नैवेद्यही केला जातो. त्यात प्रामुख्याने चिंबोऱ्या, कोळंबी तसेच वालाचं बिरडं आणि गोडामध्ये मोदक आवर्जून केले जातात. मात्र, काही जणांकडे मांसाहार न करता फक्त गोडाचंच केलं जातं. सकाळी गौरीला चहाचा नैवेद्य दाखविला जातो. अलीकडे आगरी बांधवांमध्येही काही ठिकाणी मांसाहाराची प्रथा कमी होत चालल्याचे आगरी समाजाच्या अपर्णा पाटील यांनी सांगितलं.
कानडी प्रांतात गौरीला पाच प्रकारची पक्वान्ने दाखविली जातात. त्यात भाताचे खास पदार्थ असतात. या विषयी कर्नाटकातील सुनेत्रा कोन्नूर म्हणाल्या की, “लाडाची माहेरवाशीण घरी आल्यामुळे चैतन्यमय वातावरण असते. तिच्या आवडीचे पदार्थ करण्याचा एक वेगळाच आनंद असतो. आमच्या प्रांतात नैवेद्याला प्रामुख्याने पुरणाचे कडबू असतात. भातामध्ये चित्रान्ना, बुत्ती अन्ना व आंबोडी नावाचा भजी प्रकार आवर्जून केला जातो. चित्रान्ना म्हणजे हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, हळद, हिंग यांच्या फोडणीत शेंगदाणे व डाळे परतवून घ्यायचे. थोडा फडफडीत भात करून घेऊन तो भात सदर फोडणीत घालून त्यात थोडी साखर, मीठ, ओले खोबरे, कोथिंबीर घालून थोडा लिंबाचा रस घातला जातो. तर बुत्ती अन्ना म्हणजे भातात दही, दूध, आल्याचा रस, साखर, मीठ, द्राक्षे, डाळिंब, काकडी चोचवून घातली जाते. वरून तूप, मोहरी, उडीद डाळ, कडीपत्ता, हिंग, सुक्या मिरच्या यांची फोडणी देऊन कोथिंबीर घातली जाते. या दिवशी केलेल्या या नैवेद्याची गोडी वेगळीच असते. “याच दिवसात आरोग्याला हितकारक आणि पोषक अशा फळभाज्या, विविध प्रकारच्या पालेभाज्या उपलब्ध असतात. म्हणूनच की काय सगळीकडे गौराईला भाजीभाकरीचा नैवेद्य आवर्जून दाखविला जातो.
सीकेपी ज्ञातीमध्ये गौरी आगमनादिवशी लाल माठाची भाजी-भाकरी, आंबट वरण, तांदळाची खीर हे पदार्थ नैवेद्याला दाखविले जातात. दुसऱ्या दिवशी पुरणपोळी किंवा इतर कोणताही गोडाचा पदार्थ केला जातो, तर विसर्जनादिवशी गूळ खोबऱ्याचे कान्होले आणि मोदकही केले जातात. गौरीबरोबर दहीभाताची शिदोरी दिली जाते. एवढंच काय दिवाळीत केले जाणारे बेसन लाडू, रव्याच्या करंज्याही आम्ही आमच्या गौराईसाठी आवडीने करतो, असे प्रज्ञा दवणे यांनी सांगितलं.
कोकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा, विदर्भ अशा प्रत्येक ठिकाणची गौरी गणपती उत्सवाची प्रथा, नैवेद्याच्या पद्धती वेगवेगळ्या पाहायला मिळतात. मात्र प्रत्येक स्त्रीच्या मनात गौरीच्या सणाचं सारखंच आणि एक वेगळंच स्थान असतं. सोनपावलांनी आलेली गौराई सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन वर्षभराचा आनंद पदरात घालून माघारी निघते. आपल्या तीन दिवसांच्या मुक्कामात सगळे लाड पुरवून घेऊन जेव्हा गौराई निघते तेव्हा अत्यंत भावुक मनाने गौराईला निरोप दिला जातो.
अनघा सावंत