“श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सर सर शिरवे
क्षणात फिरुन ऊन पडे ।”
– बालकवी
पवित्र श्रावणमास जवळ आला की लहानपणी पाठ केलेली ही कविता दरवर्षी आठवते.
यावर्षी शुक्रवार २९ जुलैपासून शनिवार २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत श्रावणमास आला आहे. पुनर्वसू-पुष्य नक्षत्रातील मुसळधार पाऊस संपून ऊन-पावसाचा खेळ चालू झालेला असतो. शेतीची कामेही झालेली असतात. वातावरण आनंदी प्रसन्न असते. व्रते, सण- उत्सव यांना प्रारंभ होतो.
श्रावण महिना पूर्वी ‘नभस्’ या नावाने ओळखला जात असे. या महिन्यात दररोज रात्रीच्या प्रारंभी पूर्व क्षितिजावर श्रवण नक्षत्र उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळते. तसेच, या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले.
श्रावण महिन्यात उपवास व धार्मिक कृत्ये करण्यास सांगितलेले आहे. उपवास केल्याने शरीरातील मांद्य कमी होते, आरोग्य चांगले राहते. अध्यात्मिक साधना करण्यासाठी मनाची एकाग्रता साधणे सुलभ होते. शेतीची कामे झालेली असतात. पाऊस चांगला पडून धान्योत्पादन चांगले व्हावे, शरीर-मनाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रार्थना केली जाते.
श्रावण महिन्यात दर सोमवारी भगवान शंकराप्रीत्यर्थ एकभुक्त (एक वेळ भोजन करणे) किंवा नक्त व्रत (सूर्यास्तानंतर सव्वा तासांनी भोजन) करावे असे सांगण्यात आले आहे. विवाहानंतर पहिली पाच वर्षे स्त्रिया पहिल्या श्रावण सोमवारी शंकरास एक मूठ तांदूळ, दुस-या सोमवारी तीळ, तिस-या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी सातू अशी धान्ये वाहतात.
सासरी आलेल्या सूनेला एक मूठभर का होईना, दान देण्याची सवय व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. दर श्रावण मंगळवारी मंगलागौरी पूजन, बुधवारी बुधपूजन, गुरुवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी जिवंतिका पूजन, शनिवारी अश्वत्थ मारूती पूजन आणि रविवारी आदित्य पूजन करतात. महिला एकत्र येतात. विविध खेळ खेळतात. कहाण्यांचे पुस्तक वाचून मनाचे प्रबोधन करतात.
सण नागपंचमीचा !
श्रावणात शुक्ल पंचमीला पहिला सण येतो तो नागपंचमीचा! यावर्षी मंगळवार २ ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे. नाग शेतातील धान्याची नासाडी करणा-या उंदरांचा नाश करतात म्हणून नागाच्या प्रतिमेचे पूजन करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी भाजी चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलींवर तवा ठेवू नये, कोणतीही हिंसा करू नये असे सांगण्यात आले आहे.
नागपंचमीच्या दिवशी गावातल्या महिला एकत्र येतात. वारूळाची पूजा करून दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवितात. नाग दूध पीत नाही, लाह्या खात नाही. या खाण्यासाठी तेथे उंदीर येतात, नाग उंदरांना खातात. महिला झिम्मा, फुगड्या इत्यादी खेळ खेळतात, झुल्यावर झोके घेतात, फेर धरून गाणी म्हणतात.
चल ग सये वारुळाला । नागोबाला पूजायाला ॥
हळद कुंकू वाहायाला । ताज्या लाह्या वेचायाला॥
नागपंचमीला, नको चिरू भाजीपाला ।
दया शिकवू हाताला, आज सये ॥
अशा नागपंचमीच्या लोकगीतांमधून ‘दयेचा’ संदेश देण्यात आला आहे.
विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जिवंत नागाची पूजा करा’ असे कुठल्याही धार्मिक ग्रंथात सांगण्यात आलेले नाही. नागाच्या प्रतिमेचे, पाटावर चंदनाने चित्र काढून त्याचे पूजन करावे.
यावर्षी गुरुवार ११ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन सण येत आहेत. आपल्या भारताला मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. प्राचीनकाळी या समुद्रमार्गे मोठा व्यापार चालत असे. तसेच कोळी बांधवांना मच्छिमारीच्या व्यवसायातून समुद्र रोजीरोटी मिळवून देत असतो. समुद्रकिनाऱ्यावरच्या लोकांचे जीवन हे समुद्रावरच अवलंबून असते. सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केल्यापासून आपल्या इथे पावसाळ्याला सुरुवात होते, समुद्र अशांत होतो. रौद्ररूप धारण करतो. साधारण: श्रावण पौर्णिमेपासून पावसाचा जोर कमी होतो. समुद्र शांत होऊ लागतो. श्रावण पौर्णिमेपासून मच्छीमारीसाठी होड्या समुद्रात सोडल्या जातात. व्यापारासाठी जहाजेही समुद्रात प्रवास सुरू करतात.
समुद्राची देवता वरूण याची प्रार्थना केली जाते. नवीन वस्त्रालंकार घालून ढोल, ताशा, सनई यासह वाजत गाजत गावकरी समुद्रकाठी येतात, सागराची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात.
“समुद्राच्या वरुण देवतेला आम्ही नमस्कार करतो. पावसामुळे रौद्ररूप धारण केलेल्या सागरा, आता तू शांत हो. तुफान, वादळ यांपासून तू आमचे रक्षण कर.”
श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण असतो. इंद्राच्या राणीने इंद्राच्या हाताला राखी बांधली. त्यामुळे वृत्त नावाच्या राक्षसावर विजय मिळवता आला अशी कथा आहे. पोरसाची सख्खी बहीण सावित्रीने सिकंदराच्या हातावर राखी बांधली होती. त्यामुळे त्याने पोरसाला अभय दिले. चितोडची राणी कर्मवतीने हुमायूनला राखी पाठवली. त्यामुळे चितोडचा आक्रमणापासून बचाव झाला, अशा कथा आहेत.
राखी म्हणजे केवळ सुताचा दोरा नव्हे! तर तो स्नेह, माया, प्रेम, जिव्हाळा यांचे प्रतीक आहे. दुभंगलेली माने जोडणारे एक साधन आहे. पवित्र बंधन आहे. रक्षाबंधन हा बहीण-भावाचे नाते दृढ करणारा हा सण आहे.
श्रावण महिन्यातील आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे गोकुळाष्टमी! मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी असेल त्यादिवशी उपवास करून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. दुस-या दिवशी गोपाळकाला उत्सव असतो. यावर्षी गुरुवार १८ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आणि शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी गोपाळकाला आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत नव्हता. यावर्षी तो मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे. वृंदावन, गोकुळ, मथुरा, द्वारका, जगन्नाथपुरी आणि सर्व श्रीकृष्ण मंदीरात गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जातो. दहीहंडी उत्सवात आबालवृद्ध स्त्रीपुरुष सहभागी होत असतात.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥
सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी, तसेच धर्मसंस्थापनेसाठी मी प्रत्येक युगामध्ये जन्म घेत असतो.
भगवद् गीता हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. दहीहंडी उत्सव साजरा करीत असतानाच हा ग्रंथ अभ्यासायला पाहिजे.
श्रावण अमावास्या म्हणजे पिठोरी अमावास्या ! यावर्षी शनिवार २६ ऑगस्ट रोजी पिठोरी अमावास्या आहे.
याच दिवशी मातृदिन असतो. माता ही देवासमान असते. तिचे ऋण फेडणे कठीण आहे. ऋणांचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सत्कार या दिवशी केला जातो.
पिठोरी अमावास्येच्या दिवशी पोळा हा सण शेतकरी बंधू मोठ्या उत्साहात साजरा करतात. शेतीच्या कामाला मदत करणा-या बैलांची पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. त्यांना गोडाचे जेवण देऊन, सजवून गावात मिरवणूक काढली जाते.
असा हा पवित्र श्रावणमास, सृष्टीला हिरवा शालू अर्पण करून नटवीत असतो. हसत येतो, लाजत येतो. सौंदर्याची उधळण करीत येतो. आपण निसर्गाचे हे रूप पाहून नतमस्तक होतो. पवित्र होतो. इथे मला कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ही सुंदर कविता आठवते—
“हासरा नाचरा, जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला !”
दा. कृ. सोमण
dakrusoman@gmail.com