काही भूमिका या नाटककाराने ठरवूनच एखाद्या रंगकर्मीसाठी लिहील्या आहेत का? असा प्रश्न बरेचदा पडतो. कारण त्या भूमिकेत पूर्णपणे झोकून ती जिवंत करण्याची किमया ही साधलेली असते.
नटसम्राट म्हटलं की डॉ. श्रीराम लागू, ‘घाशीराम कोतवाल’मधला नानासाहेब – डॉ. मोहन आगाशे, ‘सखाराम बाईंडर’चे निळू फुले, ‘पुरुष’चा गुलाबराव – नाना पाटेकर, ‘गारंबीचा बापू’तला बापू – डॉ. काशिनाथ घाणेकर, ‘कट्यार काळजात घुसली’ यातले खाँसाहेब म्हणजे पं. वसंतराव देशपांडे, ‘हसवाफसवी’तले – दिलीप प्रभावळकर, ‘सही रे सही’तला भरत जाधव, ‘तो मी नव्हेच’मधले प्रभाकर पणशीकर…. (यादी अपूर्ण राहील) -आणि ‘ती फुलराणी’तला प्रा. अशोक जहागीरदार अर्थातच सतीश दुभाषी!
नाटककाराच्या अभिप्रेत व्यक्तिरेखेला शंभर टक्के न्याय देणारी भूमिका या श्रेष्ठ रंगकर्मीने पार केली. जी विस्मृतीत जाणं शक्य नाही. १९७५ चा सुमार असावा. पु. ल. देशपांडे यांच्या लेखन – दिग्दर्शनातून बर्नार्ड शॉ यांच्या ‘पिग्लॉलियन’ या नाटकावरून ती ‘फुलराणी’ मराठी रंगभूमीवर अवतरली. फुलराणी अर्थात भक्ती बर्वे आणि प्राध्यापक – सतीश दुभाषी. या नाटकाने आणि या दोन भूमिकांनी इतिहास घडविला. रसिकांनी त्यावर भरभरून प्रेम केले.
१९८० साली सप्टेंबर महिन्यातच हा गुणी अभिनेता काळाआड गेला. त्यावेळी त्याचे वय जेमतेम चाळीस वर्षे होते. हे वय तसे जाण्याचे नव्हते पण एका आजाराने त्याला गाठले आणि मुंबईतच निधन झाले.
एका मुलाखतीत ‘सिंहासन’ चित्रपटावर ते भरभरून बोलल्याचेही आठवते. तेव्हाही ‘ती फुलराणी’तल्या प्राध्यापकाच्या भूमिकेने नवी ओळख दिल्याचे त्यांनी मान्य केलं होतं. वय जरी कमी असले तरी विचारांची परिपक्वता आणि जेष्ठांसारखी देहबोली ही कायम नजरेत भरणारी. पंधरा ते वीसएक वर्षे हा रंगकर्मी रंगभूमीवर जरी वावरला असला तरी त्याची डझनभर नाटके आणि पाचसहा चित्रपट प्रकाशात आलेत.
‘बस्स्! फक्त तीन महिने. हे तीन महिने माझ्या ताब्यात मिळू दे ही पोरगी… अनपढ फूटपाथवरची फुलवाली! तिला ‘फुलराणी’ करून दाखवितोच! मग तुमचा तुमच्यावर विश्वासही नाही बसायचा. फुलराणी…’ -एक जबरदस्त आव्हान घेणारा प्राध्यापक आणि त्याचे हे बोल. त्यामागला आत्मविश्वास. हा थक्क करून सोडणारा होता.
एका समर्थ अभिनयाने नाटक जिवंत झाले… प्राध्यापक शोभून दिसला… या रंगप्रवासात त्यांनी अनेक मुखवटे रंगमंचावर चढविले. देव देवाचे मंदिर, धुम्मस, बेईमान, पार्टी, बिवी करी सलाम, सूर राहू दे, अंमलदार, आनंद, कोंडी, तूच माझी राणी, शॉर्टकट, चक्रव्यूह, कन्या सासुरासी जाये, बेकेट, नेपोलियन, शांतता कोर्ट चालू आहे, मेजर चंद्रकांत, वाजे पाऊल आपुले, हिरा जो भंगला नाही, हा खेळ सावल्यांचा, हवा अंधारा कवडसा, स्वप्न एका वाल्याचे, मंतरलेली चैत्रवेल, निर्माल्य वाहिले चरणी… ही काही नाटके त्याच्या नावावर जमा झाली. भूमिकेत जीव ओतून काम करण्याची प्रवृत्ती असल्याने नाटकातील त्याची भूमिका लक्षवेधी ठरली. आणि वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’च्या भूमिकेतही ते काही प्रयोग शिरले.
नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’ या नाट्यसंस्थेने १९७३-७४च्या सुमारास वि. वा. शिरवाडकरांचे ‘बेईमान’ हे नाटक रंगभूमीवर आणले. खलनायकाच्या शोधात पंत होते. त्यावेळी ‘आय.एन.टी.’चे शिरवाडकरांनीच लिहीलेले ‘बेकेट’ नाटक रंगभूमीवर आलेलं. त्याचं दिग्दर्शन आणि मध्यवर्ती भूमिका ‘किंग हेन्री’ची सतीश दुभाषी करायचे.
त्याकडे शिरवाडकरांनी लक्ष वेधले आणि पंतांनीही खलनायक मालक धनराजच्या भूमिकेसाठी ‘सतीश’ला पक्के केले. आदिवासी मुलगी-आशा काळे आणि चंदर बनले खुद्द पंत! दिग्दर्शन पुरुषोत्तम दारव्हेकर आणि दुमजली नेपथ्य होतं पांडुरंग कोठारी यांचं! या नाटकामुळे ‘सतीश’ची एक परिपूर्ण अभिनेता म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर ओळख झाली.
फक्त पाच महिन्यात शंभरावा प्रयोगाचा विक्रमही नाटकाने केला. पाचशे प्रयोगानंतर नाटक थांबले पण मालकवर्गचा प्रतिनिधित्व करणारा ‘धनराज’ हा रसिकांच्या कायम लक्षात राहीला. पंतांसारख्या दिग्गज अभिनेत्यासमोर ‘सामना’ करणारा नट म्हणूनही एक नोंद नाट्यवर्तुळात जमा झाली! दोघांची जुगलबंदी जबरदस्तच!
आणखीन एक नाटक. जे तात्यासाहेब शिरवाडकरांचे. त्यावेळी राजेश खन्ना आणि बच्चन यांचा ‘आनंद’ चित्रपट गाजत होता. त्यावरून नाटक तयार करण्यात आले. त्यात ‘आनंद’ची भूमिका ही सतीशला मिळाली आणि त्याचे सोने केले.
१९७५ च्या सुमारास हे नाटक रंगभूमीवर आले खरे पण त्याचे पन्नासापुढे प्रयोग झाले नाहीत. गंभीर कॅन्सरचा विषय आणि पिच्चर आल्याने – ही दोन कारणे त्याला कारणीभूत ठरली – ‘आनंद’समोर डॉक्टर म्हणून कुलदीप पवार उभे राहिले होते.
‘निर्माल्य वाहिले चरणी’ हे नाटक. जे दत्ता पावसकर यांनी लिहिलेलं. यात एक वेगळी भूमिका सतीशकडे चालून आली. ‘सतीश’ नावाचा नायक पण जो आंधळा असतो. या भूमिकेसाठी त्याने प्रचंड परिश्रम घेतले. आंधळ्यांची देहबोली जाणून घेऊन त्यावर भूमिका उभी केली.
काहीदा रंगमंचावर अडखळणे, पडणे यातही झोकून दिले. यामुळे काही प्रयोगात जखमाही झाल्या पण त्याची पर्वा त्यांनी केली नाही. या नाटकात साक्षात राजा परांजपे, भारती मालवणकर, आशा पोतदार ही दिग्गज मंडळी होती.
एका नाटकावरून हिंदी चित्रपट झाला. त्याचे साक्षीदार होण्याचा योगही सतीशला मिळाला. नाटकाचे नाव ‘धुम्मस’. आय.एन.टी.ची निर्मिती होती. सतीशची ‘प्रताप’या नायकाची भूमिका. सोबत सरिता ही अभिनेत्री. दोघांचं ट्युनिंग मस्त जमलेलं. विषय थरारनाट्याचा. ‘खूनाचा आरोप आणि वेड्याचं सोंग’ याभोवती कथानक गुंतलेलं.
प्रवीण जोशींचं दिग्दर्शन कथेला न्याय देणारं. पुढे १९६९ साली या नाटकावरून बीआर चोप्रा प्रॉडक्शनने ‘इत्तेफाक’ हा पिक्चर काढला. यश चोप्रा याचं दिग्दर्शन होतं. त्यात ‘राजेश खन्ना – नंदा’ ही जोडगोळी चमकली. यात एकही गाणं नव्हतं. ‘एक मिस्ट्री थ्रिलर’ म्हणून चित्रपट चालला. नाटकही कुठेही कमी पडलं नव्हतं. तेही गाजलं.
तळागाळातला कॉमन मॅन आणि हुकमी प्रवृत्तीचे प्रशासन यातला संघर्ष असणारे ‘कोंडी’ हे नाटक. बंगाली रंगभूमीवर ‘दशचक्र’ या नावाने तुफान गाजलेलं. प्रशासन ढवळून निघालेलं. साऱ्यांनाच हादरून सोडणारे.
शंभू मित्र या दिग्गज नाट्यगुरुने याचा प्रयोग बंगालीत केलेला. याचं मराठमोळं रूपांतर हे अशोक शहाणे यांनी केले. एक संहिता म्हणून नाटक जसं गाजलं तसच त्याचे कॉमनमॅनचे प्रतिनिधित्व करणारा ‘सतीश’ हाही गाजला. कोलकत्यातले रंगकर्मी याचा प्रयोग बघण्यासाठी खास मुंबईत पोहोचले होते.
शं. ना. नवरे यांचे ‘मंजू-अंजू’ हे असेच एक नाट्य. ‘आयएनटी’ची निर्मिती आणि प्रबोध जोशी यांचे दिग्दर्शन. प्रेमप्रकरण आणि घटस्फोट यातलं एक दांपत्य आणि त्यातून निर्माण झालेला सावळा गोंधळ. यात सतीशने बाजी मारली. राजाराम हुमणे याचे ‘प्रीती परी तुजवरती’ या नाटकात आधी आत्माराम भेंडे आणि नंतर श्रीकांत मोघे यांनी भूमिका केली.
१९७१-७२ नंतर सतीशने यात भूमिका केली. त्यापूर्वी दोघांनी केलेल्या भूमिकेपेक्षा अगदी वेगळी अशी भूमिका सतीशने केल्याचे जाणकारांनी नोंदविले होते. ज्यांना स्वप्नं पाहायला आवडतं, त्यांना रात्र लहान वाटते, पण ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतं त्यांना दिवसही पुरत नाही. असा दिवसभर झपाटलेपणा या अभिनेत्यामध्ये होता. याचा अनुभव साऱ्यांनी त्यावेळी घेतलाय.
सतीशच्या नाटकांबद्दल विस्ताराने बरेच काही लिहीता येईल. येवढी विविधता त्यात आहे. एका कालखंडाचा हा रंगकर्मी जणू व जसा साक्षीदारच. चांदोबा चांदोबा भागलास का? बाळा गाऊ कशी अंगाई, सिंहासन (‘डीकास्टा’ची भूमिका), बिरबल माय ब्रदर (इंग्रजी चित्रपट) – या चित्रपटातही तो दिसला.
‘पुलंचा मामेभाऊ असूनही कधी त्याने त्याचा गैरफादा उचलला नाही. सतीशचा जन्म जरी कारवारचा पण शालेय शिक्षण हे ‘मुंबईतले पुणे’ असलेल्या विलेपार्ल्यातले. कॉलेजचे शिक्षण ‘रुईया’ महाविद्यालयातलं. ‘एम.एस.सी’ पदवी त्याने पटकावली.
नाटक हे या प्रवासात कायम सोबत ठेवलेलं. प्रसिद्धीच्या कळसावर पोहचलेल्या एका अष्टपैलू अभिनेत्याला मराठी रंगभूमी अकाली मुकली. नव्या रसिकांना काळाआड गेलेल्या एका श्रेष्ठ नटवर्याची ओळख असावी, हे यामागले प्रयोजन! ‘सतीश’ नावाच्या अष्टपैलू ‘दुभाषी’ला सलाम!
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com






