सोलापूरच्या भाषा आणि साहित्याने या प्रदेशाला घडवत मराठीलाही मोलाचे योगदान दिलेले आहे. सोलापूरमध्ये विविध संस्कृती आणि भाषांचा संगम आहे. या जिल्ह्यातील भाषिक वैविध्यामुळे येथील संस्कृतिलाही वेगळेपण प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, वीरशैव अशा विविध धर्माचे लोक राहतात. मराठी, कन्नड, उर्दू, दखनी, तेलुगु, हिंदी, गुजराथी या भाषा येथे बोलल्या जातात. त्यामुळे बहुधार्मिकता आणि बहुभाषिकता हे या जिल्ह्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते. भारतीय विविधतेचे प्रातिनिधिक चित्र या जिल्ह्यात बघायला मिळते. या वैविध्यामुळेच या जिल्ह्याचे सांस्कृतिक पर्यावरणही वेगळे ठरते. प्रादेशिक विविधताही येथे दिसून येते. त्याचे वहन प्रारंभापासूनच इथल्या साहिव्यवहाराने केलेले आहे.
कोणत्याही प्रदेशाला आकार देण्यात तेथील प्रदेश आणि संस्कृती यांचा मोलाचा वाटा असतो. त्यातूनच त्या परिसराचे वेगळेपण ठळकपणाने समोर येत असते. सोलापुरचे वेगळेपण येथील साहित्याच्या दीर्घ परंपरेतून अधोरेखित झाले आहे. साहित्य व्यवहाराचा विचार समाजसापेक्ष करावा लागतो आणि तो करताना प्रादेशिकतेला केंद्र मानावे लागते. ही समाजसापेक्षता आणि प्रादेशिकता सोलापुरी साहित्यातून व्यक्त झाली आहे.
मध्ययुगीन काळात महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या मध्यवर्ती असणारी भक्तिसाहित्याची समृद्ध परंपरा याच परिसरातून निर्माण झाली. दक्षिण भाषांच्या जवळ राहत मराठी साहित्यव्यवहार अधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न या प्रदेशातील साहित्याने केला आहे. या परिसरातील लेखनाचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस राहिलेला आहे. त्यामुळे हे लेखन जीवनसन्मुख आणि मूल्यवान झालेले आहे.
प्रारंभ काळापासूनच एकूण मराठी साहित्यव्यवहाराला सोलापुरी साहित्याचे मोठे योगदान दिलेले आहे. मध्ययुगीन काळातील साहित्य हे धर्मपर संप्रदायाशी निगडित राहिलेले आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे केंद्र हे पंढरपूर आहे. विठ्ठल हे भक्तिपीठ येथे आहे. सिद्धरामेश्वरांचे शिवयोगीपीठ सोलापूर येथे आहे. नागेश संप्रदाय, दत्त संपद्राय यांचाही प्रभाव येथील साहित्यावर आहे. काही लोकदैवते आहेत. त्यांनीही येथील साहित्याला प्रभावित केले आहे. प्रारंभकाळातील वीरशैव साहित्य महत्त्वाचे आहे. सिद्धरामेश्वरांनी ६८ हजार वचने लिहिली आहेत.
पंढरपुरातील संत नामदेव यांनी “आम्हा सापडले वर्म I करू भागवत धर्म’ या भूमिकेतून भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत करून पंथ प्रसार केला. संत नामदेवांचे कार्य महाराष्ट्रातील समूहजीवनात फार महत्त्वाचे आहे. संत जनाबाई, संत चोखामेळा व त्यांचे कुटूंबीय, संत सावता माळी, संत दामाजी, संत कान्होपात्रा, परिसा भागवत, संत कुर्मदास, संत माणकोजी भोसले, शुभराय महाराज, संत तुका विप्र, संत प्रल्हादबुवा बडवे, संतकवी दासगणु महाराज आदी संत कवींनी श्रेष्ठ दर्जाचे लेखन करून जागतिक साहित्य व्यवहारात मराठी भाषा आणि साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. वारकरी संप्रदायातील संतांनी लेकसंवादातून समाजमन घडविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. लोकप्रबोधन करण्यासाठी जनसामान्यांशी समरस होण्याची वृत्ती या लेखनातून ठळक झाली आहे.
बहिरमभट्ट, कान्होपाठक, अज्ञानसिद्ध, मन्मथशिवलिंग स्वामी या नागेश संप्रदायातील संतानीही मोलाची ग्रंथनिर्मिती केली आहे. शाहिरी वाङ्मय याच संप्रदायाने सुरू केल्याचे दिसते. शाहिरी वाड्मयाचा उगम याच संप्रदामुळे झाला. पहिला पोवाडा आणि लावणी नागेश संप्रदायाचे अज्ञानसिद्ध आणि बहिरापिसा यांनी लिहिले आहेत. त्यासोबतच पेशवाईत सोलापुरातील शाहीर रामजोशी यांनी शाहिरी वाङ्मयात मोलाची भर टाकली आहे. शिवाय राजयोगी रंगनाथ स्वामी निगडिकर आणि श्रीधर स्वामी नाझरेकर यांनी आख्यानकाव्यातून परमार्थ जाणीव व्यक्त केली आहे. मध्ययुगीन काळात सोलापुरच्या संत, पंत आणि तंत वाङ्मयाने एकूण साहित्याला दिग्दर्शित केले आहे.
आधुनिक काळात सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेले साहित्यही लक्षवेधी आहे. स्वातंत्र्य चळवळीला प्रेरित करणारी कुंजविहारी यांची राष्ट्रीय कविता आणि धनुर्धारी यांनी ग्रामीण कादंबरीचा केलाला प्रारंभ याच काळातील आहे. लोकप्रिय कादंबरीकार वालचंद शहांचे लेखन आणि कन्नडचे महाकवी द. रा. बेंद्रे यांचे लिखानही याच काळात झालेले आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ देण्याचे काम या लेखनाने केले आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात या जिल्ह्यातील लेखन अनेक दिशांनी विकसित झालेले दिसते. विविध समाजस्तरातील लेखन या काळात आलेले दिसते. या लेखनाने सोलापूर जिल्ह्यासोबतच मराठी साहित्याला दिशा दिली आहे. त्र्यं. वि. सरदेशमुख, गो. मा. पवार, श्रीराम पुजारी, निर्मलकुमार फडकुले, लक्ष्मीनारायण बोल्ली, निशिकांत ठकार, द. ता. भोसले, कॉ. तानाजी ठोंबरे, सुरेश शिंदे आदी लेखक-कवींनी मूलगामी लेखन केले आहे. भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्काराने मराठी साहित्यात उत्कृष्टतेचा लौकिक प्रस्थापित केला होता. गेल्या सात-आठ वर्षात लोकमंगल साहित्य पुरस्कार हा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जात आहे.
वीरशैव साहित्य, जैन साहित्य, कन्नड, तेलुगु साहित्य आणि महाराष्ट्र साहित्य परिषेदेच्या विविध शाखा, मनोरमा साहित्य परिवार, कवी कालिदास मंडळ यासारख्या साहित्यविषयक संस्थांचे येथील भाषा व साहित्य विकासात मोलाचे योगदान राहिले आहे.
दलित साहित्यात योगीराज वाघमारे, शरणकुमार लिंबाळे, शांताबाई कांबळे, दादासाहेब मोरे, पार्थ पोळके, ना. मा. शिंदे, भि.शी. शिंदे, किशोर शांताबाई काळे, अर्जून व्हटकर, ल. सि. जाधव यांनी महत्त्वाची भर घातली आहे.
१९९० साली पहिले अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन याच भूमीत झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला तेवत ठेवणारे शाहीर अमर शेख याच मातीतील आहेत. मराठी भाषेत साहित्य निर्मितीला सुरूवात झाली तेव्हा मराठवाडा-विदर्भ हे मराठीच्या सांस्कृतिक व्यवहाराचे केंद्र होते. ते केंद्र आधुनिक काळात मुंबई-पुण्याकडे सरकले. सोलापूर जिल्हा हा सांस्कृतिकदृष्ट्या परिघावरचा प्रदेश आहे. असे असले तरी या प्रदेशाने या भूमिचा सर्वस्तरीय आवाज पुढे आणत एकूण भाषा-साहित्याला समृद्ध केले आहे. त्यातूनच या परिसराची सांस्कृतिक उन्नती घडून आली आहे.
आजही विविध भाषेत विपुल साहित्य निर्मिती होते आहे. हे साहित्य नवे समाजमन घडवण्याचे कार्य करत आहे. विद्यापीठातील आठ भाषा विभाग भविष्यात या प्रदेशातील भाषा आणि साहित्याला योगदान देतील.
– डॉ. मृणालिनी फडणवीस
(कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)
mrunalinifadnavis@gmail.com