फोटो सौजन्य- pinterest
अनंत चतुर्दशीचा दिवस भगवान विष्णूच्या अनंत रूपाला समर्पित आहे आणि या दिवशी 10 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन देखील होणार आहे. अनंत चतुर्दशीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवसाला अनेक पटीने महत्त्व आहे. या दिवशी धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्रासह सुकर्मा रवि योगासह अनेक शुभ योग देखील तयार होत आहे. हा दुर्मिळ योगायोग तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. हा दिवस शनिवार, 6 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने आनंद आणि समृद्धी मिळते आणि आर्थिक समस्यांपासून सुटका होते असे म्हटले जाते.
हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या तिथीला भगवान विष्णूच्या अनंत रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे यालाच अनंत चतुर्दशी किंवा चौदस असे म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूंच्या शाश्वत रुपाची पूजा केली जाते. ही पूजा झाल्यानंतर हातावर अनंत सूत्र बांधले जाते. या व्रताची सुरुवात महाभारत काळात झाल्याचे मानले जाते.
असे म्हटले जाते की, सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमात्म्याने ताल, अटल, विठ्ठल, सुतल, तलताल, रसातल, पातल, भू, भुवह, स्वाह, जना, तप, सत्य, महा असे चौदा जग निर्माण केले होते. या जगांची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी, ते चौदा रूपांमध्ये प्रकट झाले, ज्यामुळे ते अनंत प्रकट झाले असे म्हणतात. म्हणून अनंत चतुर्दशी हा भगवान विष्णूंना समर्पित असल्याचे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंच्या सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर स्वच्छ पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करा. यानंतर, हातात पाणी घ्या आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूसमोर उपवास करण्याचा संकल्प करा.
पूजा करताना चौरंगावर किंवा पाटावर पिवळे वस्त्र पसरवून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा. त्यावर गंगाजल शिंपडून मूर्तीची स्थापना करा.
त्यानंतर रेशमी किंवा कापसाच्या धाग्यावर हळद किंवा कुंकू लावून त्याच्या 14 गाठी बांधा. हे अनंत सूत्र भगवान विष्णूसमोर ठेवून त्यासमोर धूप, दिवा आणि नैवेद्य दाखवा.
विष्णूजवळ पिवळी फुले, तुळशीची पाने, चंदन, केशर आणि पिवळ्या रंगांची मिठाई अर्पण करा. त्यानंतर ॐ अनंताय नमः या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते.
पूजा संपल्यानंतर अनंत सूत्र तुमच्या उजव्या हातावर बांधा. हा धागा संरक्षण, आनंद, समृद्धी आणि अनंत फळांच्या प्राप्तीचे प्रतीक मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)