अलीकडे मराठीत आठवणी, चरित्रपर, आत्मकथनपर, सदर लेखनाच्या निमित्ताने होणारे ललित लेखनाचे अनेक संग्रह आदी पुस्तके प्रकाशित होत असतात. यातील काही पुस्तके अगदी काटेकोरपणे चरित्रपर नसली तरी एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या कर्तृत्वाने प्रभावीत होऊन त्यांच्या विविध चाहत्यांकडून आठवणी म्हणून ऐकून त्याच्या एकत्रित संकलनाचे स्वरूपवजा असतात.
सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडीलकर यांचे ‘एक मनोहर कथा’ हे पुस्तकही याच धाटणीतले. कोणताही विषय अभ्यासपूर्ण व तितक्याच रंगतदारपणे मांडण्याची दैवी देणगी लाभलेल्या मंगला खाडीलकर यांनी ‘एक मनोहर कथा’ हे पुस्तकही पर्रीकरांच्या आठवणी साठवणीतल्यासारख्या सांगितल्या आहेत.
गोव्याच्या निसर्गरम्य कुशीत जन्मलेले, आय.आय.टीमध्ये उच्चविद्याविभूषीत होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात विकसित झालेले स्वर्गीय भाई तथा मनोहर पर्रीकर यांचे जीवन म्हणजे भारतीय राजकारणातील व भारतीय जनता पक्षाच्या राजकीय वाटचालीतील एक समर्पित ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्त्व.
वयाच्या ३९ व्या वर्षी आमदार, ४५व्या वर्षी मुख्यमंत्री आणि साठीपूर्वी केंद्रात संरक्षणमंत्री असा पर्रीकरांच्या यशाचा चढता आलेख. मनोहर राजकारणी, नातीगोती, मैत्र जीवाचे पत्रकार मित्र, उद्यमशील नेतृत्व, सहकाराची मुळाक्षरे, स्नेहचौकडी, धुरंधर सेनानी. आमचो भाई अशा नऊ भागांतून स्व. भाईंच्या गोव्याच्या विकासाचं, सर्व समावेशक व दूरदृष्टीचं राजकारण, संरक्षणमंत्री म्हणून अल्पावधीत त्यांनी घेतलेले अनेक धाडसी व प्रगतिशील निर्णय यांचा परिचय या पुस्तकात जवळपास ४७ सुहृदांच्या आठवणीतून मंगला खाडीलकर यांनी शब्दबद्ध केला आहे..
या सर्वांच्या तोंडून भाईंच्या सामाजिक, राजकीय सांस्कृतिक जीवनातील पट विस्तारला आहे. स्वातंत्र्यसैनिकाच्या घरात जन्मलेले, साधी राणी, संघाची सर्वसमावेशक व देशप्रेमाने भारलेली कार्यपद्धती या सर्व लेखांमधून पाहायला मिळते.
संघाची शिस्त, अनुशासन, आदर्शवाद आणि वचनबद्धतेची भावना ही मनोहरांच्या व्यक्तिमत्त्वात भिनली होती. ‘राष्ट्र प्रथम’, हे भारतीय जनता पक्षाच ब्रीद. राष्ट्र सर्वोपरी, ‘पक्ष’ त्यानंतर आणि ‘स्व’म्हणजे व्यक्ती तिसऱ्या स्थानावर ही शिकवण पर्रीकरांनी आपल्या प्रत्येक कृती व निर्णयातून सिद्ध केली. अंगीभूत साधेपणा आणि काटकसरी वृत्ती या दोन महत्त्वाच्या गुणांची जपणूक अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी केली. म्हणूनच आधुनिक गोव्याचे शिल्पकार असे गौरवोद्गार केंद्रिय मंत्री नितीन गडकरी काढतात.
आपला भाऊ, मनोहर हा लहानपणापासूनच लोकविलक्षण होता असे भाईच्या भगिनी लता कोटणीस यांच मत. हुशार, खोडकर, चिकित्सक, चौकस असे कितीतरी किस्से ‘नातीगोती’च्या लेखांमधून आले आहेत. तळ्यात उडी मारणे, विहिरीत गटांगळ्या खाणे वगैरे प्रसंग त्यांच्या बाल्यातील धाडसी व जिद्दी स्वभावाचे दर्शन घडविणारे आहेत. पत्नी मेधाच्या अकाली जाण्याने पर्रीकरांचं घर विस्कटणं; तर दुसरीकडे प्रथमच मुख्यमंत्रिपदाची स्वीकारलेली जबाबदारी असताना संसाराचं चाक निखळून पडलं तरी राज्य व घर सांभाळण यांसारख्या आठवणी त्यांच्या संयमी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणाऱ्या आहेत.
मनोहर पर्रीकरांची आक्रमक वृत्ती, अभ्यासूवृत्ती, निष्ठा यामुळे त्यांनी संबंध गोव्यात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली. शह-काटशहाचं, तोडफोडीचं राजकारण त्यांनी केलं नाही. गोव्यासाठी त्यांनी कल्याणकारी योजना, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणले. पेट्रोल कर कपात, गृहआधार योजना, लॅपटॉपचं वितरण, विद्यार्थ्यांसाठी बिनव्याजी आर्थिक साहाय्य असे विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवून भारतीय जनता पक्ष आपल्या कृतिउक्तीशी कसे बांधील आहेत, हे गोवेकरांना दाखवून दिले.
मनोहर पर्रीकर यांचे जीवन राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील अनेक माणसांनी वेढलेले होते याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो. मिलिंद करमरकर, पुरुषोत्तम शेणॉय, मनीष साळवी, आशिष करंदीकर यांनी भाईंचं मुंबईतील खास करून विलेपार्ले, अ.भा.वि.प.शी कसे निकटचे संबंध होते हे त्यांच्या गप्पांमधून दिसते.
गोव्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय जीवनाची पार्श्वभूमी ‘एक मनोहर’ला आहे यातील लेखांचे स्वरूप आठवणीवजा आहे. पुस्तकातील भाईंनी सांगितलेल्या आठवणीतून त्यांचे समृद्ध असे संस्कारी मन दिसते. सामाजिक समरसतेला महत्त्व देत पर्रीकरांनी सामाजिक न्याय, समता, बंधुत्व, सर्वसमावेशकता या मूल्यांना अंगीकारत निसर्गरम्य गोव्यात सामाजिक कार्यात, राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत गोव्याचे प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख होण्यावर त्यांनी भर दिला.
‘एक मनोहर कथा’मधील लेखांची अर्थपूर्ण शीर्षके आणि परिणामकारक शेवट ही दोन वैशिष्ट्ये. ‘आपला माणूस’- सुरेश प्रभू, ‘अतिमानवी प्रतिमेचा मनोहर बंदी’ – दिनार भाटकर, ‘कर्ता करविता’ – संदीप चोडणेकर, ‘टेक्नोक्रॅट – सी. एम.’ दत्ता खोलकर, ‘असाधारण कर्तृत्वाचे संरक्षणमंत्री’ – दत्तात्रेय शेकटकर या लेखांचे शेवट उल्लेखनीय आहेत.
‘एक मनोहर’चे आणखी विशेष नमूद करायला हवेत. ते म्हणजे मंगला खाडीकर यांचे मनोगत. मनोहर पर्रीकर नावाच्या अंगीभूत अफाट बुद्धिमत्ता, लखलखतं कर्तृत्व, पराकोटीची निःस्पृहता, आत्यांतिक समर्पण भाव, अखेरच्या क्षणापर्यंत मृत्युशी धैर्यशील झुंज देणारा हा माणूस जगला कसा, हे सांगण्यासाठी पुस्तकाचा त्यांनी घेतेलेला ध्यास या प्रस्तावनावजा मनोगतात आहे. ही प्रस्तावना ग्रंथपरिचयपर किंवा सांकेतिक स्वरूपाची नसून सहृदय पण परखड, भगवा ध्वज गुरूस्थानी मानणाऱ्या समाजकार्यकर्त्याची आहे. नवचैतन्य प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल अभिनंदन!
आज मनोहर पर्रीकर आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी घालून दिलेला आदर्श, कार्यपद्धती, गोव्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न व विचार, भाजपचे सर्व कार्यकर्ते व गोव्यातील राजकारणी यांना प्रेरणादायक ठरतील. गोव्यातील पर्रीसारख्या छोट्या गावात जन्मलेल्या संघनिष्ठ कार्यकर्त्याने अंतिम श्वासापर्यंत राज्याचा विकासच पाहिला. अशा या द्रष्ट्या कार्यकर्त्यास आदरांजली!
-raghunathshetkar0@gmail.com
प्रा. रघुनाथ शेटकर