ग्रामपंचायतीत सात कोटींचा भ्रष्टाचार उघड! (फोटो सौजन्य-Gemini)
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : तालुक्यातील करजखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत तब्बल सात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या काळात सरपंचपद रिक्त असल्याने उपसरपंचासह तीन ग्रामसेवकांचे हात बरबटलेले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील एका भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा नोंद झाला असला, तरी दुसऱ्या गंभीर प्रकरणात गुन्हा नोंद करण्याचे स्पष्ट आदेश असूनही प्रशासनाकडून कमालीची टाळाटाळ केली जात आहे. परिणामी दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप होत असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धाराशिव पंचायत समितीचे तत्कालीन विस्तार अधिकारी बी. एच. देशमुख यांनी केलेल्या चौकशीत, १ जून ते १६ नोव्हेंबर २०२२ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत पंधराव्या वित्त आयोगाच्या २२ लाख ८२ हजार ९८४ रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, हा घोटाळा केवळ एका बँक खात्याच्या पासबुकवरून समोर आला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीची इतर खात्यांची पासबुके व आवश्यक रेकॉर्ड संबंधित ग्रामसेवकाने गायब केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. वेळोवेळी मागणी करूनही ही कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. कामे न करताच पाच महिन्यांत सुमारे २३ लाखांचा अपहार, तर पाच वर्षांच्या कालावधीत संगनमताने सात कोटी रुपयांची रक्कम हडप करण्यात आल्याचे रेकॉर्डवरून समोर आले आहे. या प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक एम. आर. सावंत व उपसरपंच सुभाष महादेव कळसुले यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस चौकशी अहवालात करण्यात आली आहे.
दरम्यान, जागरूक गावकऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित उपसरपंच व ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश १५ जुलै २०२५ आणि ३० डिसेंबर २०२५ रोजी दिले आहेत. मात्र, सध्याचे विस्तार अधिकारी एस. एस. ढाकणे यांनी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल केलेला नाही. ढाकणे यांनी शासन निर्णयाचा हवाला देत, “पंचायत समिती कर्मचाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे अधिकार विस्तार अधिकाऱ्यांना नसून ते केवळ गटविकास अधिकाऱ्यांना आहेत,” असे कारण देत गुन्हा नोंद करण्यास नकार दिल्याचे सांगितले आहे.
प्रशासनातील या गोंधळामुळे कोट्यवधींचा अपहार करणारे आरोपी मोकाट फिरत असून, याचा समाजमनावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. या प्रकाराला तात्काळ पायबंद घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
“धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे आणि करजखेडा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश मला देण्यात आले होते. मात्र शासन निर्णयानुसार गुन्हा दाखल करण्याचे अधिकार विस्तार अधिकाऱ्यांना नसून ते गटविकास अधिकाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे मी या प्रकरणी गुन्हा दाखल करणार नसल्याचे गटविकास अधिकाऱ्यांना कळविले आहे.” अशी माहिती पंचायत समिती विस्तार अधिकारी संजय ढाकणे यांनी दिली.






