फोटो सौजन्य - Social Media
आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील आणि नऊमाहीतील आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ डिसेंबर २०२४ रोजी समाप्त झालेल्या या तिमाहीत कंपनीने उल्लेखनीय आर्थिक प्रगती साध्य केली आहे.
काय आहेत महत्त्वाचे आकडे? जाणून घेऊयात
३१ डिसेंबर २०२४ रोजी कंपनीच्या कर्ज खात्यांची संख्या २,८६,००० हून अधिक झाली आहे. एकूण एनपीएचा दर १.३६% पर्यंत घटला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ ऋषी आनंद यांनी सांगितले की, “आमच्या सततच्या प्रगतीमुळे आर्थिक वर्ष २०२५ च्या नऊमाहीची यशस्वी सांगता करण्यात आली आहे. एयूएममध्ये २१% वार्षिक वाढ नोंदवण्यात आली असून वितरणामध्येही तिसऱ्या तिमाहीत २०% वाढ दिसून आली आहे.” ते पुढे म्हणाले, “सरकारच्या धोरणांमुळे कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. आयकर सवलतीसारख्या निर्णयांमुळे मध्यमवर्गीय गटांची घर खरेदी करण्याची क्षमता वाढेल. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बजेट वाढल्याने किफायतशीर गृहकर्जांमध्ये वाढ होईल.”
आधार हाऊसिंग फायनान्सने या तिमाहीत १२ नवीन शाखांचे उद्घाटन केले असून आता कंपनीच्या एकूण शाखांची संख्या ५५७ वर पोहोचली आहे. ही शाखा विस्तार प्रक्रिया देशभरातील आर्थिक सेवा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करण्यात आली आहे. सध्या कंपनी २१ राज्ये आणि ५४५ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून २८६ हजारांहून अधिक कार्यरत कर्ज खात्यांना सेवा पुरवत आहे. कंपनीच्या या व्यापक जाळ्यामुळे शहरी, उपनगरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना गृहकर्ज सेवा सुलभपणे उपलब्ध होत आहेत.
यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद यांनी सांगितले की, “आम्ही ‘डीपर इम्पॅक्ट’ या धोरणाद्वारे विशेषतः ग्रामीण व उपनगरी भागांमध्ये आमच्या सेवा विस्तारावर भर देत आहोत. प्रगत डेटा-केंद्रित तंत्रज्ञानाचा वापर करून जोखीम व्यवस्थापन अधिक सुसूत्र करत असून संसाधनांचे अधिक प्रभावी वाटप करण्यात येत आहे.” त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, “आम्हाला भविष्यातील आर्थिक संधींबाबत आत्मविश्वास आहे आणि वंचित समुदायांना किफायतशीर गृहकर्ज सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” या विस्तार धोरणामुळे कंपनीला गृहकर्ज क्षेत्रातील अधिक मजबूत स्थान मिळण्याची अपेक्षा असून ग्राहकांना अधिक सुलभ आणि तंत्रज्ञान-सक्षम सेवांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.