Kumar Mangalam Birla awarded ‘Doctor of Science’ degree by University of London (photo-social media)
श्री. कुमार मंगलम बिर्ला हे शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेला भारतातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय उद्योगसमूह आणि परदेशात विस्तार करणारे पहिले भारतीय ‘बिझनेस हाऊस’ असलेल्या आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत. आज हा समूह 6 खंडांतील 41 देशांमध्ये कार्यरत असून त्याचे उत्पन्न 67 अब्ज डॉलर आहे आणि बाजारभांडवल 110 अब्ज डॉलर पेक्षा अधिक आहे.
श्री. कुमार मंगलम हे बिर्ला कुटुंबाच्या सहाव्या पिढीतील वारसदार आहेत. त्यांचे पणजोबा जी. डी. बिर्ला हे महात्मा गांधींचे निकट सहकारी होते आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. शिक्षणाचे उत्कट समर्थक असलेले श्री. बिर्ला हे बिट्स पिलानी (BITS Pilani) चे कुलपती (चान्सेलर) आहेत. तसेच आयआयएम अहमदाबाद आणि आयआयटी दिल्लीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ते लंडन बिझनेस स्कूलच्या प्रशासकीय मंडळावर देखील कार्यरत आहेत. तिथे त्यांनी 15 दशलक्ष पाउंड एवढ्या रकमेचा शिष्यवृत्ती निधी स्थापन केला असून तो युरोपमधील सर्वात मोठ्या निधीपैकी एक आहे.
श्री. बिर्ला यांना डॉक्टर ऑफ सायन्स (अर्थशास्त्र) ही उपाधी प्रदान करण्यात आली आहे. हा पुरस्कार युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या चान्सेलर असलेल्या ‘हर रॉयल हायनेस द प्रिन्सेस रॉयल’ यांच्या हस्ते बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी लंडनमधील सेनेट हाऊस येथे आयोजित स्थापना दिवस समारंभात प्रदान करण्यात आला.
लंडन विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष कविता रेड्डी म्हणाल्या, “श्री. बिर्ला यांनी उद्योग आणि परोपकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानार्थ त्यांना मानद पदवी प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे लाखो लोकांचे जीवनमान सुधारले आहे. भारत आणि यूकेमध्ये दर्जेदार शिक्षणाचा प्रसार करण्याच्या त्यांच्या बांधिलकीतून इतरांना मदत करण्याची भावना, शिक्षणाचे महत्त्व ओळखणे आणि विभाजनाऐवजी एकता निर्माण करण्याची आकांक्षा – या लंडन विद्यापीठाच्या मुख्य मूल्यांचे प्रतिबिंब प्रकट होताना दिसते.
आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, “लंडन विद्यापीठाकडून हा सन्मान स्वीकारताना मला कृतार्थ वाटत आहे. हर रॉयल हायनेस, प्रिन्सेस अॅन, द प्रिन्सेस रॉयल यांच्या हस्ते असा ऐतिहासिक सन्मान मिळणे हे विशेष गौरवाचे आहे. लंडन बिझनेस स्कूल चा माजी विद्यार्थी म्हणून, महत्त्वाकांक्षा प्रत्यक्ष यशात रूपांतरित करण्याची या विद्यापीठाची विलक्षण क्षमता मी स्वतः अनुभवली आहे. या अशा मूल्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेकडून सन्मानित होणे आणि नव्या पिढ्यांना अनिश्चित जगाचा सामना करण्यासाठी सक्षम बनवणाऱ्या संस्थेकडून गौरव प्राप्त होणे ही अत्यंत प्रेरणादायी आणि कृतज्ञ करणारी भावना आहे.”
दरवर्षी लंडन विद्यापीठ आपला स्थापना दिवस साजरा करते. ही तारीख विद्यापीठाच्या पहिल्या ‘रॉयल चार्टर’ची आठवण करून देते. 28 नोव्हेंबर 1836 रोजी विल्यम फोर्थ यांनी ते प्रदान केले होते. समारंभाचा मुख्य भाग म्हणजे मानद पदव्या आणि फेलोशिप प्रदान करणे. ही परंपरा 1903 मध्ये सुरू झाली आणि याचे पहिले सन्मानित प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स (पुढे किंग जॉर्ज पाचवे आणि क्वीन मेरी) होते.
यंदा 2025 च्या स्थापना दिवशी लंडन विद्यापीठाचे विद्यार्थी, कर्मचारी तसेच विद्यापीठाच्या 17 फेडरेशन सभासद प्रतिनिधी यांच्या जोडीला जागतिक विभागीय शिक्षण केंद्रे आणि विद्यापीठाशी दीर्घकाळ संबद्ध असलेल्या व्यक्ती उपस्थित होत्या.






