झेवियर बार्टलेटचा ओमानविरुद्ध रचला इतिहास(फोटो-सोशल मीडिया)
Xavier Bartlett creates history against Oman: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये २० फेब्रुवारी रोजी ४० व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि ओमान हे संघ आमनेसामने आले होते. पल्लेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा ९ विकेट्सने पराभव करून स्पर्धेचा शेवट गोड केला. या दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटने २०२६ च्या टी२० विश्वचषकात एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने ओमानविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन इतिहास घडवला आहे. झेवियर बार्टलेट टी२० सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोनदा विकेट घेणारा पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.
टी२० विश्वचषक २०२६ तील ४० व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाकडून बार्टलेटने पहिल्याच चेंडूवर ओमानचा सलामीवीर आमिर कलीमला माघारी पाठवले. बार्टलेटने कलीमला गोल्डन डकमध्ये बाद केले. यापूर्वी, बार्टलेटने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर साहिबजादा फरहानला आपली शिकार बनवले होते. या कामगिरीच्या जोरावर तो सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोनदा विकेट घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे.
माजी अष्टपैलू आणि कर्णधार शेन वॉटसन टी-२० विश्वचषक सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला होता. १९ सप्टेंबर २०१२ रोजी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या २०१२ च्या टी-२० विश्वचषक सामन्यादरम्यान वॉटसनने आयर्लंडविरुद्ध ही कामगिरी बजावली होती. टी-२० विश्वचषक सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा शेन वॉटसननंतर बार्टलेट हा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. या यादीमध्ये बिली स्टॅनलेकचा देखील समावेश आहे. ६ जुलै २०१८ रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध सेफास झुवाओला बाद करून बिली स्टॅनलेकने हा पराक्रम केला होता.
हेही वाचा : Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला
झेवियर बार्टलेटच्या आधी, भारताचा अर्शदीप सिंगने सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. १२ जून २०२४ रोजी न्यू यॉर्कमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील २०२४ च्या टी२० विश्वचषक सामन्यात अर्शदीप सिंगने अमेरिकेचा सलामीवीर शायन जहांगीरला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते.






