फोटो सौजन्य - Social Media
गेल्या काही वर्षांमध्ये देशातील अनेक तरुणांनी पारंपरिक नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग निवडला आहे. या प्रवासात अनेकांनी यशाची मोठी शिखरे गाठली आहेत. अशाच यशस्वी व्यक्तींपैकी एक म्हणजे दीपा प्रदीप पाई. कदाचित हे नाव तुम्ही याआधी ऐकले नसेल, पण त्यांच्या जिद्दीची आणि मेहनतीची कहाणी ऐकल्यानंतर तुम्हाला हे नाव नक्कीच लक्षात राहील. दीपा पाई या एक महिला उद्योजिका आहेत, ज्यांनी तब्बल ३० वर्षांपूर्वी बँकेतली सुरक्षित नोकरी सोडून आइसक्रीमच्या व्यवसायात पाऊल टाकले.
त्या काळात महिलांसाठी नोकरी करणेही कठीण मानले जात होते, त्यातच व्यवसाय करणे म्हणजे धाडसच. तरीही दीपा पाई यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता स्वतःचा मार्ग निवडला. त्यांनी मुंबईतील बँकेत नोकरी करताना ती सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या व्यवसायासाठी गावाकडे परतल्या. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली, पण त्यांनी कोणाचंही न ऐकता आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. 1997 साली त्यांनी फक्त 5 रुपयांची सॉफ्टी आइसक्रीम विकून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या पती प्रदीप पाई आणि दीर दिनेश पाई यांनी आइसक्रीम व्यवसायात पाऊल टाकले होते आणि दीपा पाई याही या प्रवासात त्यांच्यासोबत सहभागी झाल्या.
2003 साली पाई कुटुंबाने ‘हॅंग्यो आइसक्रीम’ या ब्रँडची स्थापना केली. त्यांच्या या ब्रँडचा पहिला प्रॉडक्ट म्हणजे सॉफ्टी आइसक्रीम, जी 90 च्या दशकातील मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. याच सॉफ्टीने हॅंग्यो ब्रँडला ओळख मिळवून दिली. सातत्याने मेहनत, गुणवत्ता आणि नाविन्य यामुळे हळूहळू हॅंग्योने देशातील सात राज्यांमध्ये आपली बाजारपेठ निर्माण केली.
आज हॅंग्यो आइसक्रीम ही 300 कोटींची कंपनी झाली आहे आणि दीपा पाई या या कंपनीच्या सहसंस्थापक आणि वाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही प्रेरणादायी कहाणी अनेक तरुण-तरुणींना आणि विशेषतः महिलांना व्यवसायात यश मिळवण्यासाठी नवी उमेद आणि दिशा देते.