ऑपरेशन सिंदूर नंतर संरक्षण क्षेत्रातील शेअर्स तेजीत, 'हे' स्टॉक राहतील फोकसमध्ये (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Defence Stock Marathi News: बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीपासूनच घसरण झाली असली तरी, सुरुवातीच्या घसरणी नंतर बाजार सावरण्यास सुरुवात झाली आणि निफ्टीने लवकरच २४५० च्या पातळीला स्पर्श केला. सकाळी ९:३० वाजता सेन्सेक्स ८०,७६१.९२ अंकांवर पोहोचला. त्यात १२०.८५ अंकांनी म्हणजेच ०.१५ टक्के वाढ झाली. त्याच वेळी, निफ्टी ५२.८० (०.२२%) अंकांनी वाढून २४,४३२.४० वर व्यवहार करत आहे. ७ मे रोजी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर बाजारात संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. बाजार उघडताच माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये ४ टक्के वाढ झाली.
बुधवारी संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली, माझगाव डॉक शिपबिल्डर्स सारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये ४ टक्क्या पर्यंत वाढ झाली. भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर ही वाढ झाली.
ऑपरेशन सिंदूरच्या बातमीमुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL) चा शेअर १.८ टक्के वाढून ४,५८९ रुपये झाला, कोचीन शिपयार्डचा शेअर २% वाढून १,५११ रुपये झाला आणि भारत डायनॅमिक्सचा शेअर १.७ टक्के वाढला. डेटा पॅटर्न १.३ टक्के वाढले, माझगाव डॉक शिपबिल्डर्स ३.७ टक्के वाढून ३,०७७.८० रुपये झाले, तर पारस डिफेन्स ३ टक्के वाढून १,३९३.८० रुपये झाले.
तथापि, सुरुवातीच्या व्यवहारात स्टॉकमधील वाढ काहीशी कमी झाली. इंडिया VIX मध्ये ४टक्के वाढ झाली आहे आणि बाजारात अस्थिरता वाढत आहे. संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की भारताने विशेष अचूक शस्त्रांचा वापर करून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट ही प्रमुख ठिकाणे आहेत. या ऑपरेशनमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या समन्वित प्रयत्नांचा समावेश होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणांना लक्ष्य केले गेले आहे ते भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि निर्देश करण्यासाठी वापरले जाणारे केंद्र होते. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, “काही काळापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्यात आल्या, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि त्यांचे निर्देश दिले जात होते.”
पहलगाम येथे अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये २५ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता.