(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Experian Industry : डेटा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पातळीवरील अग्रगण्य कंपनी असलेल्या इक्सपेरियन (Experian) ने ‘इंडस्ट्री इनसाइट्स – मे २०२६’ हा कर्जविषयक उद्योगजगताबाबतचा ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतातील वैयक्तिक आणि किरकोळ कर्ज अर्थात रिटेल कर्जाच्या बाजारपेठेत भरभक्कम वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. कर्जाच्या मागणीत त्याचबरोबर तारण आधारित कर्जांमध्ये सातत्याने वाढ आणि कर्जपरतफेडीच्या पध्दतीत सुधारणा यावर अहवालामध्ये प्रकर्षाने प्रकाश टाकण्यात आलेला आहे. कर्ज मागणीच्या बाजारपेठेतील हे प्रवाह ही बाजारपेठ अधिक मजबूत बनत चालली असून कर्जाच्या मागणीसाठी वातावरणही स्थिर असल्याचे संकेत देत आहेत.
बापरे… इतकी कमाई! Gautam Adani यांनी रचला इतिहास, 2026 मध्ये दररोज कमवला एवढा मोठा आकडा
भारताची रिटेल कर्ज बाजारपेठ आर्थिक वर्ष २०२६ मध्ये सातत्याने वाढली राहिली. मार्च २०२६ मध्ये व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) १३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून त्यात वार्षिक १९ टक्के वाढ झाली आहे. नवीन कर्ज वितरणातही वार्षिक ३१ टक्के वाढ होऊन ते ७५ लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. यावरून अधिकाधिक ग्राहक कर्ज घेत असल्याचे दिसून येत आहे.
तारण आधारित कर्ज वितरणात जोरदार वाढ टिकलेली आहे. सुवर्ण कर्ज, गृहकर्ज आणि अन्य मालमत्ता-आधारित उत्पादनांनी या वाढीचे नेतृत्व केले आहे. बँका/वित्तीय संस्था कमी जोखीम असलेल्या कर्ज वितरणावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, तर कर्जदारसुध्दा सुरक्षित कर्जाचे पर्याय निवडण्यावर भर देत असल्याचे या प्रवाहातून दिसून येते.
प्रथमच कर्ज घेत असलेल्या ग्राहकांना बँकींग व्यवस्थेसारख्या औपचारिक कर्ज प्रणालीत आणण्यात सुवर्ण कर्ज हा पर्याय सातत्याने मदत करत आहे. जलद कर्ज प्रक्रिया आणि अतिशय सहज मिळणारे कर्ज हे घटक सुवर्ण कर्जाच्या वाढीला गती देत आहेत. सुवर्ण कर्ज लोकांना त्यांच्या घरगुती आणि व्यावसायिक गरजा तत्काळ पूर्ण करण्यासाठी खूपतच मदत करत आहेत.
मागील वर्षातील मंदीनंतर, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये विनातारण कर्ज वितरणातही जोरदार वाढ दिसून आली. वैयक्तिक कर्ज आणि ग्राहक वित्त उत्पादनांनी या वाढीचे नेतृत्व केले आहे. यावरून ग्राहकांकडून असलेली मजबूत मागणी आणि कर्जदारांमधील वाढता आत्मविश्वास दिसून येतो. डिजिटल कामकाज पध्दत ग्राहकांमध्ये झपाट्याने रुळत चालल्याने त्याचबरोबर बँका आणि वित्तीय संस्था विशेषतः फिनटेक कंपन्यांचा विविध शहरात विस्तार यामुळे टियर २, टियर ३ आणि टियर ४ शहरांमध्येही वैयक्तिक कर्जांच्या मागणीत सातत्याने वाढ झाली आहे.
कर्जपुरवठ्याच्या संपूर्ण उद्योग क्षेत्रात कर्ज परतफेडीच्या पद्धतींमध्ये झालेल्या सुधारणांवर हा अहवाल प्रकाशझोत टाकतो. मार्च २०२६ मध्ये ‘निव्वळ ३० पेक्षा अधिक दिवस थकीत कर्जांचे प्रमाण’ सुधारून सुमारे ३.० टक्क्यांवर आले आहे. यातून कर्ज वितरण पद्धत अधिक सक्षम झालेली आहे, त्याचबरोबर कर्जदारांचे कर्ज परतफेडीचे सुधारलेले वर्तनही दिसून येते.
रिटेल कर्जाचा विस्तार करण्यात एनबीएफसी (गैर-बैंकिंग वित्तीय कंपन्या) आणि फिनटेक कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विशेषतः असुरक्षित अर्थात विनातारण आणि उपभोग-आधारित कर्जपुरवठ्याच्या प्रकारात या कंपन्या वित्तपुरवठ्यात अग्रणी आहेत. तर दुसरीकडे, सरकारी बँकांनीही सुरक्षित कर्ज श्रेणींमध्ये, विशेषतः गृहकर्ज आणि प्राधान्य-क्षेत्रांमधील विभागांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
विविध श्रेणींचा विचार करता, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज, ग्राहकपयोगी वस्तू कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज, क्रेडिट कार्ड्स आणि दुचाकी वाहनांसाठीची कर्जे या सर्वच क्षेत्रांत सातत्याने वाढ झाली आहे. भारतातील कर्ज बाजारपेठेत सर्वच स्तरावर असलेली जोरदार मागणी यातून प्रकट होते.






