फोटो सौजन्य - Social Media
बंगळुरू येथे आयोजित ‘एअरो इंडिया २०२५’दरम्यान गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या गोदरेज अँड बॉईसच्या एअरोस्पेस विभागाने भारताच्या आत्मनिर्भरतेला बळकटी देणारे महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले. या करारांमधून देशाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांना पाठबळ मिळणार आहे. विशेषतः संरक्षण मंत्रालयाच्या एअरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA)सोबत झालेल्या करारामुळे भारताच्या अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) कार्यक्रमासाठी अत्याधुनिक फ्लाइट कंट्रोल अॅक्च्युएटर्सच्या स्वदेशी उत्पादनाला गती मिळणार आहे.
गोदरेज आणि एडीए यांच्यात गेल्या दोन दशकांपासून भागीदारी आहे, आणि या करारामुळे भारताच्या एअरोस्पेस तंत्रज्ञानाच्या स्वदेशीकरणाला मोठी चालना मिळणार आहे. यामध्ये डीडीव्ही-आधारित सर्व्हो अॅक्च्युएटर्स आणि इतर महत्त्वपूर्ण घटकांचा विकास करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे गोदरेज एअरोस्पेस AMCA साठी फ्लाइट कंट्रोल अॅक्च्युएटर्सच्या निर्मिती, चाचण्या आणि गुणवत्ता तपासणीच्या जबाबदारीसह संपूर्ण विकास प्रक्रिया सांभाळणार आहे. गोदरेज कंपनी पारंपरिक बिल्ट टू प्रिंट संकल्पनेतून बिल्ट टू स्पेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत आहे. थ्री-डी प्रिंटिंग सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत कंपनीने उत्पादन प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा केली आहे. हे तंत्रज्ञान गुंतागुंतीचे घटक एका प्रक्रियेत तयार करण्यास सक्षम करते, परिणामी उत्पादन कार्यक्षमता वाढते आणि वेळ वाचतो.
गोदरेजच्या या उपक्रमाला डीजीएक्यूए, डीआरडीओ लॅब्स, इस्रो, एचएएल, बीडीएल, बीईएल यांसारख्या प्रमुख भारतीय संस्थांकडून तसेच बोईंग, जीई एअरोस्पेस, हनीवेल, आयएआय, पार्कर एअरोस्पेस, राफेल, रोल्स-रॉइस, सफ्रान यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या ‘गोदरेज अँड बॉईस’च्या एरोस्पेस व्यवसायाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड मानेक बेहेरामकामदिन म्हणाले, “ही भागीदारी एअरोस्पेस क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेप्रती आमची वचनबद्धता दर्शवते. भारताच्या एअरोस्पेस क्रांतीच्या आघाडीवर राहून, अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि अचूक उत्पादनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करताना आम्हाला अभिमान वाटतो. भारताच्या उत्पादन क्षमतांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धात्मकता निर्माण करण्यासाठी आणि त्यास चालना देण्यासाठी आम्ही सातत्याने योगदान देत आहोत.”
‘एअरो इंडिया २०२५’मध्ये गोदरेज अँड बॉईस आपल्या सर्वसमावेशक एअरोस्पेस उत्पादन क्षमतांचे प्रदर्शन करत आहे. विशेष धातूंपासून तयार करण्यात आलेले फॅन्स, कम्प्रेसर्स, टर्बाइन्स आणि शाफ्ट असे प्रगत एअरो इंजिन घटक या प्रदर्शनात मांडण्यात आलेले आहेत. कंपनीच्या अत्याधुनिक मशीनिंग कौशल्याचे उत्तम उदाहरण म्हणून या घटकांचा उल्लेख करता येईल. टायटॅनियम, ऍल्युमिनिअम आणि स्टेनलेस स्टील यांपासून तयार केलेल्या व अचूक अभियांत्रिकी असलेल्या ट्यूब्स, डक्ट्स आणि ब्रॅकेट्स; त्याचबरोबर अॅक्च्युएटर्स, नोज-व्हील स्टीयरिंग मॅनिफोल्ड्स, ल्युब्रिकेशन पंप्स आणि अपलॉक्स यांसारखे स्वदेशी विकसित केलेले लाइन रिप्लेसेबल युनिट्स (एलआरयू) अशा गोष्टी या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. विमानाच्या पायलॉनसाठी विकसित केलेले ‘एजेक्टर रिलीज युनिट’चे (ईआरयू) कार्यान्वित मॉडेल आणि मानवरहित हवाई वाहनांसाठी (यूएव्ही) तयार करण्यात आलेले विविध कार्बन फायबर कंपोझिट भाग ही उत्पादने कंपनीच्या उत्पादन क्षमतांचे दर्शन घडवितात.