नवी दिल्ली : गुगलने त्यांच्या कोअर टीममधून किमान 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. परंतु गुगल भारत आणि मेक्सिकोमध्ये या नोकऱ्यांसाठी भरती करणार आहे. गुगलच्या पहिल्या तिमाहीतील कमाईच्या अहवालापूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे. गुगलने एकीकडे त्यांच्या महत्त्वाच्या आणि इंजिनीअरिंग टीममधून नोकरकपात केली असली तरी युनिटच्या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून कंपनी मेक्सिको आणि भारतात संबंधित पदांसाठी भरती करणार आहे.
गुगलने त्याच्या फ्ल्युटर, डार्ट आणि पायथन टीममधून कर्मचाऱ्यांना याआधीच काढून टाकले आहे. त्यानंतर सुमारे दोन दिवसांनी पुन्हा नोकरकपातीची घोषणा केली. नोकरकपात केलेली 50 पदे ही सनीवेल, कॅलिफोर्निया येथील कंपनीच्या अभियांत्रिकी विभागातील आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे. गुगल डेव्हलपर इकोसिस्टमचे उपाध्यक्ष असीम हुसेन यांनी या नोकरकपातीची घोषणा केली आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला होता.
कर्मचाऱ्यांना म्हटले आहे की, या वर्षातील त्यांच्या टीमसाठी ही सर्वात मोठी नियोजित नोकरकपात होती. जागतिक स्तरावर उच्च वाढीच्या ठिकाणी विस्तार करत असताना आमचा सध्याचा जागतिक ठसा कायम ठेवण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून आम्ही आमच्या भागीदार आणि विकासक समुदायांच्या जवळ काम करू शकू, असे हुसेन यांनी ईमेलमध्ये नमूद केले.