33 वर्षांचे झालेत आकाश-ईशा अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये निभावताय महत्त्वाची भुमिका; वाचा... त्यांची संपत्ती!
भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत असलेलया मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश आणि मुलगी ईशा अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. मुकेश अंबानी हे देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा कारभार सांभाळत आहे. ईशा आणि आकाश अंबानी आज (ता.२३ ऑक्टोबर) बुधवारी रोजी 33 वर्षांचे झाले आहे.
दोघेही रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. एकीकडे ईशा अंबानी रिलायन्स रिटेलचा व्यवसाय नव्या उंचीवर नेत आहे. तर दुसरीकडे भाऊ आकाश अंबानी हा रिलायन्स जिओची जबाबदारी सांभाळत आहे. या दोघांच्या वाढदिवशी आपण त्यांच्या एकूण नेटवर्थबाबत (एकूण संपत्ती) जाणून घेणार आहोत…
ईशा-आकाशचा हुरुन श्रीमंतांच्या यादीत समावेश
रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी हे जगातील अव्वल अब्जाधीशांमध्ये आहेत. तर त्यांचा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी यांचाही हुरुन श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. अलीकडेच हुरुन इंडिया अंडर-35 यादी 2024 प्रसिद्ध झाली आहे. ज्यामध्ये आकाश-ईशा अंबानी यांचा सर्वात तरुण वैयक्तिक उद्योजक म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स रिटेलचा व्यवसाय ईशा अंबानींकडे सोपवला आहे. तर आकाश अंबानी यांच्या देखरेखीखाली रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा व्यवसाय सातत्याने वाढत आहे.
हे देखील वाचा – सेन्सेक्स, निफ्टीच्या घसरणीसह शेअर बाजार बंद; मार्केट कॅपमध्ये 94000 कोटींची उसळी!
ईशा अंबानीवर रिटेल व्यवसायाची जबाबदारी
ईशा अंबानीचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 रोजी झाला असून, आज ती 33 वर्षांची आहे. ईशा रिलायन्स रिटेलचा व्यवसाय सांभाळत आहे आणि कंपनीत बिगर कार्यकारी संचालकाच्या भूमिकेत व्यवसायाला पुढे नेत आहे. हुरुन श्रीमंतांच्या यादीत ईशा अंबानी 31 व्या स्थानावर आहे. मीडीया रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे 800 कोटी रुपये इतकी आहे. ईशा अंबानीच्या नेतृत्वाखाली रिलायन्स रिटेल सतत नवनवीन डील करत आहे आणि आपला व्यवसाय वाढवत आहे.
रिलायन्सच्या 47 व्या एजीएम बैठकीदरम्यान ईशा अंबानी यांनी सांगितले होते की, यावर्षी देशात 1840 नवीन रिलायन्स रिटेल स्टोअर्स उघडण्यात आली आहेत. ज्यामुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्म जिओ मार्ट वेगाने विस्तारतो आहे. जिओ मार्टची सेवा आतापर्यंत देशभरातील 300 शहरांपर्यंत पोहोचली आहे. ते म्हणाले की, आमच्या ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.
आकाश अंबानी देखील निभावताय मोठी भूमिका
आकाश अंबानी हा ईशा अंबानीचा जुळा भाऊ आहे. त्याचा देखील हुरुन इंडिया अंडर-35 यादी 2024 मध्ये 32 व्या स्थानावर क्रमांक लागतो. आकाशची एकूण संपत्ती 3300 कोटी रुपये इतकी आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी रिलायन्स जिओचे कामकाज हाताळतो आहे. यात तो 5जी आणि एआय तंत्रज्ञानाचा प्रचार करून कंपनीच्या व्यवसायाला सतत नवीन उंचीवर नेत आहे. दरम्यान, मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये आपल्या मुलांचे कौतुक करताना रिलायन्स सुरक्षित हातात असल्याचे म्हटले होते.