लव्हलोकलची मुंबईतील प्रतिष्ठित सोसायटी स्टोअर्सशी भागीदारी (फोटो सौजन्य-X)
मुंबई : लव्हलोकल या भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या डिजिटल रिटेल प्लॅटफॉर्मने सोसायटी स्टोअर्सशी भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे ही परंपरागत स्थानिक रिटेल साखळी प्रथमच ऑनलाइन कामकाज करणार आहे. लव्हलोकलच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या ६० वर्षे जुन्या रिटेल दुकानाने आता स्वत:चे डिजिटल स्टोअरफ्रण्ट सुरू केले आहे. या स्टोअरफ्रण्टवर ग्राहक अखंडितपणे ब्राउज करू शकतात, नवीन उत्पादने शोधू शकतात आणि उत्पादनांच्या संपूर्ण कॅटलॉगमधून हवे ते उत्पादन मागवू शकतात. मुंबईतील सहा दुकानांपैकी लोखंडवाला, ओशिवरा आणि चेंबूर येथील तीन दुकानांवर लव्हलोकल आता सक्रिय झाले आहे. आणखी काही दुकानांची यात लवकरच भर पडणार आहे.
गेल्या सहा दशकांपासून सोसायटी स्टोअर्स हे मुंबईकरांच्या अनेक पिढ्यांसाठी परिचयाचे नाव आहे, दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून ते अव्वल दर्जाच्या उत्पादनांपर्यंत सर्व काही देऊ करणाऱ्या या दुकानांच्या साखळीने दर्जा व विश्वास यांच्या आधारावर लौकिक प्रस्थापित केला आहे. आता या भागीदारीमुळे लव्हलोकल इंटरनेटकेंद्री ग्राहकांनाही सेवा देऊ शकेल आणि सोसायटी स्टोअर्सने गेल्या अनेक दशकांपासून प्राप्त केलेला विश्वास व विश्वासार्हता यांचा वारसा पुढे जात राहील.
स्थानिक रिटेल व्यवसायासाठीही हा सहयोग महत्त्वाचा ठरत आहे. आधुनिकीकरण म्हणजे वारसा सोडून देणे नव्हे, तर तो पुढे घेऊन जाणे हे सोसायटी स्टोअर्सने डिजिटल मार्ग स्वीकारून दाखवून दिले आहे. आजच्या ग्राहकांना ऑनलाइन वस्तू मागवण्यातील सोय हवी आहे पण उत्पादनाचा ताजेपणा, वाजवी किंमत किंवा विश्वासार्हता यांबाबत तडजोड करण्यास ते तयार नाहीत. अनेक पिढ्यांतील ग्राहक ज्या विश्वासार्हतेवर विसंबून होते तीच विश्वासार्हता सोसायटी स्टोअर्स आता लव्हलोकलच्या माध्यमातून ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना देऊ शकत आहे.
लव्हलोकलच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आकांक्षा हझारी या नवीन भागीदारीबद्दल म्हणाल्या, “स्थानिक रिटेल विक्रेत्यांच्या हाती योग्य डिजिटल साधने देऊन त्यांना जलद गतीने बदलणाऱ्या बाजारपेठेत जोमाने वाढण्यासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट आम्ही लव्हलोकलच्या माध्यमातून ठेवले आहे. सोसायटी स्टोअर्ससोबतची भागीदारी हा याच उद्दिष्टाचा साहजिक विस्तार आहे. हे केवळ एक दुकान ऑनलाइन घेऊन जाणे नाही, तर आजच्या ग्राहकांना खरेदी विनासायास करण्याची मुभा देण्यासोबतच अनेक दशकांचा विश्वास व वारसा अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न आहे. सोसायटी स्टोअर्स हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. स्थानिक व्यवसाय हेच रिटेलिंगचे भवितव्य आहे हा संदेश व वारसा आम्ही लव्हलोकलवर आणून देत आहोत.”
सोसायटी स्टोअर्सचे मालक लक्ष्मीचंद गाडा म्हणाले, “ऑनलाइन खरेदी हा नवीन नियम झाल्याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. आम्ही जे काही करत आलो त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या आमच्या ग्राहकांना आता विश्वासासोबतच सोयीस्कर खरेदीचा अनुभवही हवा आहे. गेल्या सहा दशकांहून अधिक काळापासून ते दर्जा व सातत्य यांसाठी आमच्यावर अवलंबून राहिले आहेत आणि लव्हलोकलच्या माध्यमातून डिजिटल मार्ग अवलंबल्यामुळे आम्हाला नवीन युगात आमची विश्वासार्हता पुढे नेण्याची मुभा मिळणार आहे. त्यामुळे सोसायटी स्टोअर्स ग्राहकांच्या पूर्वी कधीही नव्हते एवढे जवळ पोहोचणार आहेत. लव्हलोकल हा योग्य भागीदार आहे, कारण हा प्लॅटफॉर्म स्थानिक दुकानांच्या जागी दुसरी दुकाने आणण्याऐवजी स्थानिक दुकानांची व्याप्ती वाढवतो, आम्हाला आधुनिकीकरणाची साधने पुरवतो आणि आमची विश्वासार्हता व अस्सलता जपण्याची मुभाही देतो.”
लव्हलोकलसाठी ही भागीदारी प्रतिकात्मकही आहे आणि धोरणात्मकही आहे. परंपरागत संस्थाही प्लॅटफॉर्मवर अखंडितपणे कशा उत्क्रांत होऊ शकतात हे दाखवून देत असल्याने हा प्लॅटफॉर्म प्रतिकात्मक आहे, तर सोसायटी स्टोअर्सकडे आद्य रिटेलर म्हणून बघणाऱ्या भारतभरातील हजारो रिटेलर्सना प्रेरणा देत असल्याने तो धोरणात्मक आहे. या सहयोगाच्या माध्यमातून देशभरात एक चळवळ सुरू करण्याचे ध्येय लव्हलोकलने ठेवले आहे. यांत प्रत्येक दुकान, मग ते अनेक वर्षे जुने सुपरमार्केट असो किंवा परिसरातील फळे-भाजी विक्री केंद्र असो, ग्राहकांना सारख्याच सहजतेने ऑफलाइन व ऑनलाइन सेवा देऊ शकते.