फोटो सौजन्य - Social Media
भारताचा पूर्वी जगभरात व्यापार होता आणि देश ‘सोने की चिडिया’ म्हणून ओळखला जात होता. पुन्हा ते वैभव प्राप्त करण्यासाठी स्टार्टअप्स ही चळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आयोजित “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” कार्यक्रमात केले. यामध्ये विविध क्षेत्रांतील २४ स्टार्टअप्सनी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांची सादरीकरणं केली.
सामान्य प्रशासन विभागाने ५ ते ९ मे दरम्यान हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये महाराईज-स्टार्टअप पिचिंग सेशनदेखील आयोजित करण्यात आले होते. यावेळी सहा सरकारी विभागांनी स्टार्टअप्ससोबत काम करण्यास तयार असल्याचे जाहीर केले. मंत्री लोढा यांनी ग्रामीण भागातील स्टार्टअप्सची संख्या कमी असल्याचे नमूद करत, सरकार त्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, आयुक्त आर. विमला, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, नाविन्यता सोसासटीचे आयुक्त नितीन पाटील, सचिव गणेश पाटील आणि अंशू सिन्हा, पोलिस महासंचालक अर्चना त्यागी, सहसचिव गीता कुलकर्णी यांचा समावेश होता. अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे कामकाज गतीमान पध्दतीने सुरू आहे याची माहिती देताना त्या म्हणाल्या.देशात सर्वाधिक स्टार्टअप्स असलेले आपले राज्य असून २८ हजार ४०६ र्स्टाटअप्सच्या माध्यमातून ३ लाख पेक्षा अधिक रोजगार निर्माण झाला आहे.यामध्ये १४००० पेक्षा जास्त स्टार्टअप महिला नेतृत्वाखाली आहेत.महाराष्ट्र स्टार्ट अप २०२५ हे नवीन येणारे धोरण,महाराष्ट्र स्टार्ट अप विक याबद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमात सहभागी स्टार्टअप्सना त्यांच्या प्रकल्पांची प्रायोगिक अंमलबजावणी शासनाच्या संबंधित विभागांमध्ये करण्याची संधी मिळणार आहे. त्यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचा कार्यादेश देण्यात येणार आहे. यामध्ये हेल्थटेक, अॅग्रीटेक, गव्हटेक, पर्यावरण, IoT, एआय, रोबोटिक्स, नॅनो टेक यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश होता. यावेळी डॉ. युवराज परदेशी लिखित ‘स्टार्टअप रोड मॅप’ या माहितीपूर्ण पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.