Paytm Payments Service: Paytm चा मोठा बदल! ऑफलाइन पेमेंट व्यवसाय PPSL कडे हस्तांतरित..; 2,250 कोटींची केली गुंतवणूक (फोटो-सोशल मीडिया)
Paytm Payments Service: पेटीएमची मुख्य कंपनी असलेली वन९७ कम्युनिकेशन्सने पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेड (पीपीएसएल) मध्ये २,२५० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक पूर्ण केली आहे. आरबीआयच्या मंजूरीनंतर ही गुंतवणूक पीपीएसएलच्या इक्विटी शेअर्सच्या राइट्स इश्यूमध्ये सबस्क्राइब करून करण्यात आली. याबद्दल सविस्तर माहिती पेटीएमने दिली आहे. पेमेंट अॅग्रीगेटर म्हणून पीपीएसएल काम करणार आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये या कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अंतिम मंजुरी मिळाली. पीपीएसएल ही वन९७ कम्युनिकेशन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
पेमेंट अॅग्रीगेटर परवाना मिळाल्याने, व्यापाऱ्यांना पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस ऑनबोर्ड करू शकतील. त्याच बरोबर ऑनलाइन व्यवहार सुलभ करू शकतील. मार्च २०२० मध्ये कंपनीने पेमेंट अॅग्रीगेटर परवान्यासाठी पहिल्यांदा अर्ज दाखल केला होता परंतु आरबीआयने नोव्हेंबर २०२२ मध्ये हा अर्ज फेटाळला. एफडीआयच्या मानकांचे पालन केल्यानंतर कंपनीला पुन्हा अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यावेळी पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेसना नवीन व्यापाऱ्यांना ऑनबोर्डिंग करण्यासही मनाई करण्यात आली होती. ऑगस्ट २०२५ मध्ये ही बंदी उठवण्यात आली. चीनच्या अलिबाबा ग्रुपने पेटीएममधील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे.
हेही वाचा : Salary PF: नव्या लेबर कोडनुसार जास्त PF कपात होणार कमी होणार वेतन? सरकारने भीती मिटवली; चिंता केली दूर
आपला ऑफलाइन व्यापारी पेमेंट व्यवसाय वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने पीपीएसएलकडे हस्तांतरित केला. या बदल्यात वन९७ कम्युनिकेशन्सना रोख रक्कम मिळाली. हे हस्तांतरण होल्डिंग कंपनी आणि तिच्या १००% मालकीच्या उपकंपनीमध्ये आहे, त्यामुळे मालकी किंवा नियंत्रणात कोणताही बदल होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
पेटीएमकडे साउंडबॉक्स, पॉइंट-ऑफ-सेल मशीन आणि ऑनलाइन पेमेंट गेटवेसह अंदाजे १४ दशलक्ष ऑफलाइन व्यापारी विविध पेमेंट सबस्क्रिप्शन डिव्हाइसेस वापरतात. हस्तांतरणासह, पीपीएसएलकडे वन९७ कम्युनिकेशन्सने दोन वरिष्ठ व्यवस्थापन अधिकाऱ्यांना देखील पाठवले आहेत. यामध्ये रिपुंजय गौर, सीओओ (ऑफलाइन पेमेंट्स) आणि दीपेंद्र सिंग राठोड, सीटीओ (पेमेंट्स) यांचा समावेश आहे.
हेही वाचा : IPO Market 2025: आयपीओ फंडरेझिंगमध्ये हाँगकाँग दुसऱ्या क्रमांकावर, भारताची देखील विक्रमी कामगिरी
वन९७ कम्युनिकेशन्सचा जुलै-सप्टेंबर २०२५ या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल वार्षिक आधारावर २४ टक्क्यांनी वाढून २,०६१ कोटी रुपये झाला असून यात निव्वळ नफा २११ कोटी रुपये होता. सलग दुसऱ्या तिमाहीत कंपनीला नफा झाला. ईबीआयटीडीए वाढून १४२ कोटी रुपये झाला आणि ईबीआयटीडीए मार्जिन ७% होता. पेटीएमचा पेमेंट सर्व्हिसेस महसूल वर्षानुवर्षे २५ टक्क्यांनी वाढून १,२२३ कोटी रुपये झाला.
बीएसईवर वन ९७ कम्युनिकेशन्सच्या शेअरची किंमत सध्या १३०५.८५ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ८३,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ६ महिन्यांत या शेअरमध्ये जवळपास ४६ टक्के वाढ झाली आहे. ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने स्टॉकसाठीची लक्ष्य किंमत १,२४० रुपयांवरून १,४५० रुपये प्रति शेअर केली आहे. वाढलेली देयके आणि कर्ज वितरण, उत्पादन अपग्रेडमधून सुधारित मार्जिन आणि चांगले UPI मिश्रण यामुळे कमाईत चांगली वाढ होण्याची अपेक्षा ब्रोकरेजचे म्हणणे आहे. FY28 पर्यंत Paytm ला 12,523 कोटी रुपयांचा निव्वळ महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.






