पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत वाचला शेतकऱ्यांसाठीच्या विकासाचा पाढा; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोनच दिवसांपुर्वी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरले होते. त्यास प्रतिउत्तर देताना आज (ता.३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत विकासाचा पाढा वाचला आहे. नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसह सर्वच घटकांसाठी आपल्या १० वर्षांच्या काळात उत्तम काम केले आहे. मात्र, काही लोक जाणूनबुजून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर ते बोलत होते.
शेतकऱ्यांचे कल्याण सरकारच्या अजेंड्यावर
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून, शेतीसाठीच्या भांडवलाची अल्प व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मोठा निधी वितरित केला जात आहे. याउलट मागील सरकारच्या अर्थात काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना नाडले जात होते. इतकेच नाही तर काँग्रेस काळात सर्वच स्तरावर शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात होती, असा आरोपही नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला आहे.
खत अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मोठी मदत
याशिवाय केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना १२ लाख कोटींची खत अनुदानाच्या स्वरूपात मदत केली आहे. इतकेच नाही तर सरकारकडून दरवर्षी शेतकऱयांच्या पिकांच्या हमीभावात सातत्याने वाढ केली जात आहे. विशेष म्हणजे सरकारकडून मोठ्या प्रमाणात धान आणि गहू या प्रमुख पिकांचीसरकारी खरेदी केली जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसकडून शेतकरी कर्जमाफीचा गाजावाजा
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस काळातील शेतकरी कर्जमाफी केल्याचा उल्लेख करताना काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे. आपल्या कार्यकाळात काँग्रेस सरकारने शेतकरी कर्जमाफी केली. मात्र, केवळ तीन कोटी शेतकऱ्यांना त्यावेळी कर्जमाफी मिळालेली असताना, त्यावेळी ६० हजार कोटी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाल्याचा गाजावाजा तत्कालीन काँग्रेस सरकारकडून करण्यात आला होता. असा आरोपही मोदी यांनी यावेळी केला आहे.
शेती क्षेत्रात मोठा बदल होणार
याशिवाय सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी जगातील सर्वात मोठी अन्नधान्य भंडारण योजना सुरु केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपापल्या परिसरात शेतमाल साठवणुकीसाठी मोठी मदत होणार आहे. इतकेच नाही तर केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आधुनिक करण्याचा प्रयत्न करत, त्यांचे कष्ट कमी केले जात आहे. त्याअंतर्गत ‘ड्रोन दीदी योजना’ राबविली जात आहे. या योजनेमुळे देशातील शेती क्षेत्रात मोठा बदल पाहायला मिळणार आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.