आनंदाची बातमी... रिलायन्स कंपनी 'या' राज्यात 65000 कोटींची गुंतवणूक करणार; 250000 बेरोजगारांना रोजगार मिळणार!
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वातील कंपनी रिलायन्सस इंडस्ट्रीज लिमिटेडने बेरोजगार तरुणांसाठी पुढाकार घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या माध्यमातून मुकेश अंबानी यांनी आंध्र प्रदेशात 500 बायोगॅस प्लांटमध्ये सुमारे 65000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. क्लीन एनर्जी इनिशिएटिव्ह अंतर्गत गुजरात बाहेरील कंपनीत रिलायन्सने केलेली आतापर्यंतची ही सर्वाधिक गुंतवणूक असणार आहे.
रिलायन्स-आंध्र प्रदेश सरकारचा सामंजस्य करार
क्लीन एनर्जी इनिशिएटिव्हचे नेतृत्त्व मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजिव अनंत अंबानी करत आहे. कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. अंनत अंबानी आणि आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांच्यात नुकतीच या संदर्भात मुंबईत बैठक झाली आहे. या बैठकीत योजनेला अंतिम रूप देण्यात आले आहे. विशेष म्हणजे आज (ता.१२) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत विजयवाडा येथे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आंध्र प्रदेश उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
आंध्र प्रदेश सरकारने नुकत्याच अधिसूचित केलेल्या एकात्मिक क्लीन एनर्जी पॉलिसीअंतर्गत बायो फ्यूल प्रोजक्ट्सला प्रोत्साहन दिले आहे. यात पाच वर्षांसाठी सीबीजी प्लांट्सवरील निश्चित भांडवली गुंतवणुकीवर 20 टक्के भांडवली सबसिडी तसेच एसजीएसटी आणि पाच वर्षांसाठी वीज शुल्काची संपूर्ण परतफेड समाविष्ट आहे.
काय म्हटलंय माहिती-तंत्रज्ञान मंत्र्यांनी?
या सामंजस्य कराराबाबत बोलताना आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांनी सांगितले आहे की, राज्यात रोजगार निर्मिती वाढवणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आम्ही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आमच्या एकात्मिक क्लीन एनर्जी पॉलिसीअंतर्गत बायो फ्यूल प्रोजक्ट्सला प्रोत्साहन देत आहोत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आंध्र प्रदेश उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार होत आहे, याचा सर्वाधिक आनंद होत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून 65000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असेही नारा लोकेश यांनी यावेळी सांगितले आहे.
हे देखील वाचा – नववर्षात खुशखबर मिळणार… सरकार जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवणार!
तरुणांसाठी गेम चेंजर ठरेल ही गुंतवणूक
रिलायन्सने केलेली 65000 कोटींची गुंतवणूक आंध्र प्रदेशातील तरुणांसाठी गेम चेंजर ठरणार असल्याचा विश्वास नारा लोकेश यांनी व्यक्त केला आहे. 250000 नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, रिलायन्स केवळ सरकारी नापीक जमिनींचे नूतनीकरण करणार नाही तर शेतकऱ्यांसोबत काम करेल आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांना बायो फ्यूल प्रोजक्ट्सच्या लागवडीचे प्रशिक्षण देणार आहे. शेतकरी दरवर्षी त्यांचे उत्पन्न 30000 रुपये प्रति एकर वाढवू शकतील, असेही सरकारी पातळीवरून सांगण्यात आले आहे.