फोटो सौजन्य - Social Media
छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील युवा उद्योजक शिखर अग्रवाल सध्या चर्चेत आहेत. अमेरिकेच्या प्रतिष्ठित बिझनेस मॅगझीन ‘फोर्ब्स’ने ‘30 अंडर 30 एशिया 2025’ या यादीत हेल्थकेअर श्रेणीत त्यांना स्थान दिलं आहे. या यादीत 30 वर्षांखालील आशियातील 300 उदयोन्मुख उद्योजकांची निवड 10 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केली जाते. शिखर अग्रवाल यांनी IIT बॉम्बेमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली असून ते रायगडमधील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक राजेंद्र अग्रवाल यांचे सुपुत्र आहेत. विशेष बाब म्हणजे, शिखरने आपल्या व्यवसायासाठी घरून कोणतीही आर्थिक मदत घेतली नाही. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर स्टार्टअप उभारलं असून आज त्यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर जवळपास 100 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
शिखर यांनी IIT बॉम्बेमध्ये शिक्षण घेत असतानाच आपल्या वर्गमित्रासोबत ‘हेल्थ नाऊ’ नावाचा एक स्टार्टअप सुरू केला. ही सेवा ओला आणि उबरसारख्या कॅब सेवांसारखी असून, गरजूंना तात्काळ ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणारी होती. कोरोना महामारीच्या काळात या स्टार्टअपने 10 हजारहून अधिक लोकांना मदत केली होती. याच अनुभवातून प्रेरणा घेऊन शिखरने ‘अनहद फार्मा’ या बी2बी फार्माटेक स्टार्टअपची सुरुवात केली. औषधांची वेळेवर उपलब्धता नसल्यानं त्यांना फार त्रास झाला होता आणि तिथूनच या स्टार्टअपने जन्म घेतला. विशेष म्हणजे, यासाठीही त्यांनी घरी कोणतीही आर्थिक मागणी केली नव्हती.
‘अनहद फार्मा’ हे एक असे तंत्रज्ञानाधिष्ठित व्यासपीठ आहे, जिथून किरकोळ विक्रेते त्यांच्या गरजेनुसार औषधे मागवू शकतात, त्याचे ट्रॅकिंग करू शकतात आणि पुढील मागणीचे अंदाज देखील घेऊ शकतात. या स्टार्टअपने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून ऑर्डरिंग आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा एक सशक्त सिस्टिम विकसित केला आहे. सध्या देशभरातील 2,000 पेक्षा जास्त फार्मेसी या प्लॅटफॉर्मशी जोडल्या गेल्या आहेत. 150 हून अधिक औषध कंपन्यांशी करार झाले आहेत. आता शिखर त्यांच्या कंपनीसाठी B2C मॉडेलवर आधारित एक नवीन ॲप लाँच करणार असून, याद्वारे ग्राहकांना दर्जेदार औषधे योग्य किंमतीत आणि वेळेवर मिळतील.
शिखर अग्रवाल यांची ही कहाणी तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. जिद्द, मेहनत, आणि सामाजिक भान यांच्या जोरावर ते आज फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणारे रायगडचे पहिले तरुण उद्योजक ठरले आहेत.