मुंबई: अदानी समूहाच्या (Adani Group) समभागात गेल्या आठवड्यात तेजी बघायला मिळाल्यानंतर पुन्हा एकदा पडझड बघायला मिळत आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहातील समभागात 50 टक्क्यांपेक्षा जास्त पडझड बघायला मिळाली होती. मात्र गेल्या तीन महिन्यात अदानींच्या समभागात तेजी दिसत होती. मात्र शेअर्सच्या तुफान वाढीनंतर अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises) कंपनीच्या शेअर्सवर स्टॉक एक्सचेंजने पाळत ठेवली आहे. (Adani Group)
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील समभागांचे खूप नुकसान झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यात अदानी समूहातील कंपन्यांनी चांगलं कमबॅक केलं आहे. ज्याचा फायदा अदानींना होत आहे. बुधवारी गौतम अदानी यांनी जगातील टॉप-20 अब्जाधीशांच्या यादीत पुनरागमन केलं होतं. मात्र आता अदानी समूहावर पुन्हा संकट आलं आहे.
अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या वाढीनंतर अदानी एंटरप्रायझेस या प्रमुख कंपनीच्या शेअर्सवर स्टॉक एक्स्चेंजने पाळत ठेवली आहे. बीएसई आणि एनएसईनं अल्प मुदतीसाठी देखरेखीखाली ठेवले आहे. त्यामुळे काल आणि आज अदानी समूहातील काही शेअर्समध्ये घसरण बघायला मिळाली.
अदानी समूहाकडून हिंडेनबर्ग अहवालाचं खंडन केल्याचं बघायला मिळालं आहे. दुसरीकडे अदानी समूहाकडून आपल्या कंपन्यांमध्ये गंगाजळी येण्यासाठी प्रयत्न देखील केले. अशात अदानी एंटरप्रायझेजमध्ये बाजारातून 12 हजार 500 कोटी रुपये उभारण्यासाठी मंजुरी दिली गेली. सोबतच अदानी समुहाच्या समभागात देखील अनेक बाहेरील कंपन्यांनी गुंतवणूक केली. हिंडेनबर्गनं केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीला अदानींच्या स्टॉकच्या किंमतीत कोणतीही त्रुटी आढळली नाही. त्यामुळे अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागात वाढ झाल्याचं बघायला मिळालं. सेबीचा प्राथमिक अहवाल दिलासादायक असतानाच सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाच्या चौकशीसाठी आणखी दोन महिन्यांची मुदत वाढ बाजारातील गुंतवणूकदारांसाठी दिलासा होता.
मार्च महिन्यात अदानींच्या समभागांची 15 हजार कोटी रुपयांची खरेदी झाली, त्यामुळे समूहातील भांडवल 10 टक्क्यांनी वाढल्याने समभागात देखील वृद्धी झाल्याचं दिसलं.
अदानी एंटरप्राईझेजला याआधी देखील बाजार नियामकने देखरेखीखाली ठेवले होते. मात्र मार्च महिन्यात देखरेख बंद करण्यात आली. अदानींच्या समभागात अनेक सामान्य गुंतवणूकदारांचाही पैसा लागला आहे. त्यामुळे अदानींचा फायदा असो किंवा तोटा, त्याचा परिणाम हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांवर देखील होताना बघायला मिळत असतो.