दोन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार पुन्हा ढासळला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण!
चालू आठवड्यात गेले दोन दिवस शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळाली. मात्र आता दोन दिवसांच्या नेत्रदीपक वाढीनंतर, भारतीय शेअर बाजार आज पुन्हा ढासळला आहे. बाजारात आज गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे बुधवारी (ता.११) दुपारच्या व्यवहारात बाजारात मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांच्या उच्चांकावरून सेन्सेक्स 700 अंकांनी तर निफ्टी 230 अंकांनी घसरला आहे. ऊर्जा, तेल आणि वायू आणि बँकिंग शेअर्सच्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण दिसून आली आहे.
आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 398 अंकांच्या घसरणीसह 81,523 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 123 अंकांच्या घसरणीसह 24,918 अंकांवर बंद झाला आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या उच्चांकावरून सेन्सेक्स 700 अंकांनी तर निफ्टी 230 अंकांनी घसरला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा गुंतवणुकदारांमध्ये काहीसे निराशेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
(फोटो सौजन्य – istock)
गुंतवणुकदारांना तब्बल 2.53 लाख कोटींचा फटका
मार्केटमध्ये प्रॉफिट बुकींगमुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 463.49 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 460.96 कोटी रुपये इतके होते. त्यामुळे आजच्या व्यवहारात बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये 2.53 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
या शेअर्समध्ये तेजी
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 10 शेअर्स वाढीसह बंद झाले आहे. तर 20 शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत. निफ्टीच्या 50 समभागांपैकी केवळ 13 शेअर वाढीसह बंद झाले आहे. तर 37 शेअर तोट्यासह बंद झाले आहेत. आज बाजारात वाढत्या शेअर्समध्ये एशियन पेंट्स 2.18 टक्के, बजाज फायनान्स 1.57 टक्के, सन फार्मा 0.88 टक्के, एचयूएल 0.58 टक्के, एचसीएल टेक 0.39 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.37 टक्के, आयटीसी 0.19 टक्के, ॲक्सिस बँक 0.08 टक्के, भारती एअरटेल 0.05 टक्के वाढीसह बंद झाले.
हे शेअर्स घसरले
तर आज बाजारात घसरण झालेल्या शेअर्समध्ये टाटा मोटर्स 5.77 टक्के, एनटीपीसी 1.56 टक्के, अदानी पोर्ट्स 1.53 टक्के, एलअँडटी 1.51 टक्के, एसबीआय 1.45 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 1.42 टक्के घसरणीसह बंद झाले आहेत. आजच्या व्यवहारात एफएमसीजी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली आहे. याशिवाय बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा हेल्थकेअर, धातू, ऊर्जा, तेल आणि वायू, मीडिया क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत. दरम्यान, आजच्या ट्रेडिंग सत्रात मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली आहे.