फोटो सौजन्य - Social Media
दिल्लीतील युवा उद्योजिका प्रीतिका सिंह यांची ही प्रेरणादायी यशोगाथा आहे. केवळ 26 व्या वर्षी त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मार्च 2020 मध्ये त्यांनी ‘मोह’ नावाचा फर्निचर ब्रँड उभारला आणि केवळ चार वर्षांत तो कोट्यवधींचा टर्नओव्हर करणारा यशस्वी ब्रँड ठरला.
प्रीतिका यांचा जन्म व्यावसायिक कुटुंबात झाला असून सुरुवातीपासूनच त्यांची व्यवसायाकडे ओढ होती. त्यांनी 2012 मध्ये मॉडर्न स्कूल, बाराखंभा रोड येथून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातील भगतसिंह कॉलेजमधून बी.कॉम. केले. 2016 मध्ये त्यांनी अर्न्स्ट अँड यंग या नामांकित कंपनीत फक्त 22 हजार रुपये पगारावर नोकरीची सुरुवात केली. पुढे त्यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये एम.एस्सी. पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी एका आंतरराष्ट्रीय हेल्थकेअर कंपनीत काम केले आणि जानेवारी 2020 पर्यंत पन्नास हजार रुपयांवर पोहोचल्या. तथापि, नोकरीत समाधान मिळत नसल्याने आणि व्यवसाय सुरू करण्याची जिद्द असल्याने त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली नवीन योजना आखली. वडिलांच्या कंपनीतील संसाधनांचा वापर करून फर्निचर ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला. मार्च 2020 मध्ये ‘मोह’ या ब्रँडची स्थापना झाली. सुरुवातीला फक्त पाच कर्मचारी आणि वडिलांच्या कारपेंटरांच्या मदतीने त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली.
याच काळात देशात लॉकडाऊन जाहीर झाले होते. अनेक व्यवसाय बंद पडले, पण प्रीतिकाने यात संधी पाहिली. घरातून काम करण्याचा ट्रेंड वाढल्यामुळे टेबल, खुर्च्यांची मागणी वाढेल, हे तिने ओळखले. त्वरित ‘वर्क फ्रॉम होम सिरीज’ अंतर्गत नवीन डिझाइन्स बाजारात आणले. उत्पादनांच्या छायाचित्रांसाठी अडचण आल्याने CGI (कंप्युटर-जनरेटेड इमेजरी) चा वापर करून 3D मॉडेल तयार केले. मे 2020 मध्ये वेबसाइट सुरू झाली आणि जून महिन्यात त्यांना पहिला ऑर्डर मिळाला. हा त्यांच्या प्रवासातील मोठा टप्पा ठरला.
पहिल्या महिन्यातील विक्री फक्त 3.5 लाख रुपयांची असली तरी व्यवसाय झपाट्याने वाढत गेला. चार वर्षांत ‘मोह’ने 8 हजारांहून अधिक फर्निचर पीसेस विकले असून टर्नओव्हर 3.7 कोटी रुपयांवर पोहोचला. आज ‘मोह’कडे 900 पेक्षा जास्त उत्पादनांची रेंज आहे. ग्राहकांना कस्टमाइजेशनची सोय असून मोठ्या कंपन्या आणि शाळांसाठीही फर्निचर प्रकल्प ते हाताळतात. प्रीतिका सिंह यांनी दाखवून दिले की आव्हानांना घाबरून न जाता योग्य वेळ साधून त्यांचा फायदा करून घेतल्यास यश नक्की मिळते. त्यांची कहाणी प्रत्येक तरुण उद्योजकासाठी प्रेरणादायी ठरते.