
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने नव्हते. विद्यार्थ्यांच्या ताटात पोषण आहार पोहोचावा, हा एकमेव उद्देश होता. शासनाने तातडीने निर्णय घेतल्याने राज्यातील लाखो विद्याथ्यांना दिलासा मिळाला आहे. हा विद्यार्थ्यांच्या हक्काचा विजय आहे, असं श्रमजीवी संघटना, प्रवक्ते चंद्रा जाधव यांनी केलं आहे.
पालघरमध्ये झालेल्या या आंदोलनाची गंभीर दखल घेत शासनाने संबंधित पुरवठादारांना तातडीने करार प्रक्रिया पूर्ण करून सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये धान्य पोहोचवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्यभर युद्धपातळीवर धान्य आणि पोषण आहाराचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो विद्याथ्यांच्या ताटात पुन्हा मध्यान्ह भोजन पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
धान्य पुरवठा बंद पडल्याने आदिवासी, दुर्गम भागासह गरीब विद्यार्थी आहारापासून वंचित राहिले होते. त्यामुळे संतप्त श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यांनी ३१ जुलैला एकाच वेळी राज्यभर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांसह ताटली मोर्चे काढून राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ, कार्याध्यक्ष बाळाराम भोईर, सरचिटणीस विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कासाठी केलेल्या या आंदोलनामुळे शासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागल्याचा दावा संघटनेने केला आहे.