फोटो सौजन्य - Social Media
Wadhwani Foundation आणि Gates Foundation यांनी भारतातील संशोधनाधारित नवोपक्रमांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. दोन्ही संस्थांमध्ये नुकताच सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, नॅशनल इनोव्हेशन नेटवर्क (NIN)च्या माध्यमातून देशातील संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेला नवी गती देण्याचा उद्देश या सहकार्यामागे आहे. NIN हे Wadhwani Innovation Network चे राष्ट्रीय स्तरावरील विस्तारित रूप मानले जात आहे.
या उपक्रमाअंतर्गत आरोग्य, पोषण, बायोटेक्नॉलॉजी, जीनोमिक्स, मेडटेक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. संशोधन संस्थांमध्ये विकसित होणाऱ्या कल्पनांना प्रत्यक्ष समाजोपयोगी उपायांमध्ये रूपांतरित करण्यासाठी हे सहकार्य कार्य करणार आहे. यामध्ये प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट, प्रोटोटायपिंग, पायलट डिप्लॉयमेंट, IP सहाय्य, कमर्शियलायझेशन आणि स्टार्टअप निर्मिती यांसारख्या सुविधा संशोधकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या भागीदारीअंतर्गत Gates Foundation पुढील पाच वर्षांत NIN अंतर्गत पाच सेंटर्स ऑफ एक्सलन्सना पाठबळ देणार आहे. त्यापैकी दोन केंद्रांची सुरुवात यावर्षीच होणार आहे. या केंद्रांमधून प्रयोगशाळांमध्ये सुरू असलेल्या संशोधनाला प्रत्यक्ष वापरात आणण्यास मदत केली जाणार आहे. IIT Bombay, IIT Madras, IIT Delhi, IIT Kanpur, IIT Hyderabad, IISc आणि C-CAMP यांसारख्या प्रमुख संस्थांमध्ये यापूर्वीच सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात आले आहेत.
Wadhwani Foundation चे CEO डॉ. अजय केला यांनी सांगितले की, या सहकार्यामुळे भारताची इनोव्हेशन क्षमता अधिक वेगाने विकसित होईल आणि संशोधकांना त्यांच्या कल्पनांचे स्टार्टअप्स व सामाजिक परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी मोठी संधी मिळेल. तर Gates Foundation च्या इंडिया कंट्री ऑफिसच्या डायरेक्टर अर्चना व्यास यांनी भारतातील संशोधन संस्थांमधून पुढील दशकातील महत्त्वपूर्ण आरोग्य आणि पोषणविषयक नवोपक्रम समोर येतील, असा विश्वास व्यक्त केला. NIN चे उद्दिष्ट पुढील तीन ते पाच वर्षांत देशभरात २५० हून अधिक सेंटर्स ऑफ एक्सलन्स उभारण्याचे आहे. या माध्यमातून ट्रान्सलेशनल रिसर्च, संशोधक-नेतृत्वाखालील उद्योजकता आणि कमर्शियलायझेशनला चालना मिळणार असून, नवोपक्रमाधारित सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






