महाराष्ट्र 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा संकल्प
नवभारत मीडिया ग्रुप आयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव 2026’ मध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत होत असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी बहुचर्चित उत्तन – विरार सी लिंक या महत्वकांक्षी प्रोजेक्ट्ला मंजुरी दिली असल्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पाला अंदाजे तब्बल ५८ हजार ७५४ कोटी रुपये इतका खर्च अनुमानित असून या मार्गाची लांबी सुमारे ५५.१२ किलोमीटर इतकि असणार आहे. त्यात सी लिंकची लांबी २४.३५ किमी आणि रस्तेमार्गाची लांबी ३०.७७ किमी इतकी असवणार आहे. हा प्रकल्प सुमारे पाच वर्षात पूर्ण करण्याचा मानस असून या मार्गाचे नाव ‘मुंबई वाढवण एक्सप्रेस वे’ असे असणार आहे.
नवभारत मीडिया ग्रुप आयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव 2026’ मध्ये मुंबई आणि MMR क्षेत्रात होणाऱ्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “धारावी पुनर्विकास प्रकल्प सात वर्षात पूर्ण होईल. पुढच्या वर्षांपासून लोकांना घरं मिळणं सुरु होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अक्खी धारावी एक नवीन बीकेसी झालेली असेल. विरार अलिबाग कॉरिडॉरचे लँड अक्विझिशन पुढील ३ ते ४ महिन्यात आम्ही संपवू. त्यानंतर त्याच काम सुरु होईल. पुढच्या साडेतीन ते चार वर्षात आम्ही हे काम संपवू. मुंबई कोस्टल रोड नॉर्थ म्हणजे वर्सोवा ते भाईंदरपर्यंत जो आहे त्याचे वेगवेगळ्या टप्प्यात काम चालू आहे. आणि साधारणपणे त्याचे टप्पे हे २०२८ ते २०२९ मध्ये पूर्ण झालेले असेल. उत्तन विरार सी लिंकसाठी सगळ्या मान्यता झाल्या आहेत. माझ्या जपान दौऱ्यात जायका ने त्याचे अप्रुव्हल दिलं होतं. आता त्यांच्या प्रोसेसमध्ये आहे त्यासाठी अंदाजे एक वर्ष लागू शकतो. पण एक वर्ष ते सवा वर्षात आपण त्याच काम करू शकतो. उत्तन विरार सी लिंक हि देशातील सगळ्यात मोठी सी लिंक असेल त्यासाठी काम सुरु केल्यानंतर चार ते साडेचार वर्ष लागतील. वाढवणचा फेज १ हा आपण २०२८ साली पूर्ण करु शकतो. हे सगळे प्रोजेक्ट मिळून २५ लाख कोटी रुपयांची व्हॅल्यू तयार करेल. ठाणे बोरिवली बोगद्याचे काम चालू आहे. दुर्दैवाने त्याचे काम १५ महिने मागे आहे. मध्यंतरी जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यासाठी लागणारे साहित्य उशिरा आले. साधारणपणे हे काम २०२८ पर्यंत पूर्ण करायचं होतं पण आता हे काम २०२९ च्या मार्चपर्यंत पूर्ण करायचं आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
आरोग्य विभागाच्या तसेच शासनाच्या विविध योजनांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा






