पाकिस्तानची ट्रेन हायजॅक करणारी बलुच लिबरेशन आर्मी नक्की आहे तरी काय? काय आहे मागणी?
बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानची रेल्वेचं अपहरण केलं असून २० पाकिस्तानी सैनिकांची हत्या केली आहे. संपूर्ण ट्रेनचा ताबा घेण्यात आला असून १८२ प्रवाशांना ओलिस ठेवण्यात आलं आहे. पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने असे हल्ले करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरम्यान बलुच लिबरेशन आर्मी नक्की काय आहे? त्यांची विचारसरणी काय आहे आणि ते पाकिस्तानचा इतका द्वेष का? जाणून घेऊया…
बलुच लिबरेशन आर्मी ही एक संघटना आहे जी पाकिस्तानपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहे. या संघटनेच्या लढवय्यांनी गेल्या अनेक वर्षांत पाकिस्तानमध्ये अनेक मोठ्या दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत. हळूहळू ते चीनलाही लक्ष्य करत आहेत. २००० मध्ये बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्यासाठी आणि त्याला स्वतंत्र देश बनवण्यासाठी बलुच लिबरेशन आर्मी स्थापन करण्यात आली होती. ही संघटना पहिल्यांदा १९७० च्या दशकात जगासमोर आली. झुल्फिकार अली भुट्टो यांच्या सरकारच्या काळात बलुचांनी बंड सुरू केले. झिया-उल-हक पुन्हा सत्तेवर आल्यावर, हे सशस्त्र बंड संपुष्टात आले. यानंतर, २००० मध्ये हे बंड पुन्हा सुरू झाले जे आजही सुरू आहे.
सध्या बलुचिस्तानात सक्रिय असलेल्या अतिरेकी संघटनांमध्ये बलुच लिबरेशन फ्रंट, बलुच लिबरेशन आर्मी, बलुच रिपब्लिकन गार्ड, बलुच लिबरेशन टायगर्स, बलुच नॅशनलिस्ट आर्मी आणि युनायटेड बलुच आर्मी यांचा समावेश आहे. यापैकी बलुच लिबरेशन आर्मी सर्वात सक्रिय आणि शक्तिशाली आहे. तथापि, या सर्व पक्षांचे उद्दिष्ट एकच आहे – स्वातंत्र्य.
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा एक मोठा प्रांत आहे आणि त्याची लोकसंख्याही मोठी आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या प्रत्येक उपक्रमाला या भागात प्रचंड पाठिंबा मिळतो. येथील नवीन पिढी देखील या अजेंड्याशी जोडलेली आहे आणि त्यांना पाठिंबा देत आहे. याच कारणामुळे २००६ मध्ये पाकिस्तान सरकारने या संघटनेवर बंदी घातली. २०२४ मध्येही पाकिस्तानने या लष्कराचा अतिरेकी संघटनेत समावेश केला होता.
बलुचिस्तानमधील त्यांच्या भूभागासाठी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि अनेक संघटना अनेक दशकांपासून लढत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की पाकिस्तान सरकार त्यांच्या प्रदेशातील (बलुचिस्तान) संसाधनांचे शोषण करत आहे आणि बलुच लोकांना मूलभूत सुविधाही पुरवत नाही. बीएलएचा दावा आहे की पाकिस्तान सरकारने नेहमीच बलुच लोकांशी गैरवर्तन केले आहे आणि त्यांची संघटना याविरुद्ध लढत आहे.
बीबीसीच्या एका वृत्तानुसार, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी बलुचिस्तानमधील लोकांना पाकिस्तानात राहायचे नव्हते आणि त्यांना एक स्वतंत्र देश हवा होता. हे होऊ शकले नाही आणि बलुचिस्तान पाकिस्तानचा हा संघर्ष जवळजवळ सात दशकांपासून सुरू आहे. बलुचिस्तानला एक देश बनवण्याची मागणी करणारे हे लढवय्ये मार्क्सवादी विचारसरणीने प्रेरित आहेत. ते आधुनिक आणि पारंपारिक दोन्ही शस्त्रे वापरण्यात प्रवीण आहेत. या विचारसरणीने प्रेरित होऊन, बलुच लिबरेशन आर्मी या प्रदेशाच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहे.