व्हाट्सएपने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एसएमबी) ‘व्हाट्सएप भारत यात्रा’ उपक्रम सुरू केला आहे. डिजिटल सक्षमीकरणाला चालना देणारा हा उपक्रम लघु व्यवसायांना व्हाट्सएपच्या विविध टूल्सचे प्रशिक्षण देईल. यामध्ये व्यावसायिक संवाद कौशल्ये विकसित करणे, डिजिटल उपस्थिती मजबूत करणे, आणि ग्राहकांशी चांगल्या पद्धतीने जोडणी करणे यावर भर दिला जाईल. या टूरची सुरुवात दिल्ली-एनसीआरमधील लोकप्रिय बाजारपेठांपासून झाली आहे, जसे लक्ष्मी नगर, राजौरी गार्डन, आणि नेहरू प्लेस. यानंतर, बस आग्रा, लखनौ, कानपूर, अहमदाबाद, आणि म्हैसूरसारख्या शहरांमध्ये प्रवास करेल.
या उपक्रमातून वैयक्तिकृत प्रशिक्षण देणे तसेच डिजिटल कौशल्ये वाढवण्यावर भर दिला जाईल. या उपक्रमाद्वारे लघु व्यवसायांना त्यांच्या व्हाट्सएप बिझनेस प्रोफाइलसाठी कॅटलॉग तयार करणे, जाहिरातींचे व्यवस्थापन करणे, आणि ग्राहकांशी संवाद वाढवणे यासाठी मदत केली जाईल. तसेच, त्यांना जलद प्रतिसाद, अपॉइंटमेंट रिमाइंडर्स, आणि सानुकूल संदेश पाठवण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल.
नवीन वैशिष्ट्यांचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. तसेच व्हाट्सएपचा वापर आता काही और होणार आहे.
व्हाट्सएपने नुकतेच मेटा वेरिफाइड आणि एआय-सक्षम सेवा सुरू केल्या आहेत, ज्यामुळे व्यवसायांना विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढवता येईल. या यात्रेद्वारे, व्यवसायांना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार मार्गदर्शन मिळेल. भारतातील मेटाच्या बिझनेस मेसेजिंगचे संचालक रवी गर्ग म्हणाले, ”लघु व्यवसाय भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत आणि योग्य डिजिटल टूल्स मिळाल्यास त्यांच्यामध्ये देशाच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्याची क्षमता आहे.व्हाट्सएप भारत यात्रा या व्यवसायांना ग्राहकांशी डिजिटली कनेक्ट होण्यासाठी, विकास करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य व ज्ञान देत त्यांच्या संपूर्ण क्षमता समोर आणण्यास मदत करण्याप्रती आमची कटिबद्धता आहे. प्रत्यक्ष व डिजिटली व्यवसायांच्या गरजांची पूर्तता करत आमचा भारतातील उद्योजकता क्षेत्रात अर्थपूर्ण, दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्याचा मनसुबा आहे.”
व्हाट्सएप भारत यात्रा हा उपक्रम मेटाच्या इतर योजनेचा भाग आहे, ज्यामध्ये इंडिया एसएमई फोरमसह चालवलेल्या ‘डिजिशास्त्र’ उपक्रमाचा समावेश आहे. याशिवाय, मेटाने ओएनडीसीसोबत धोरणात्मक भागीदारी करून लघु व्यवसायांच्या डिजिटल विकासाला प्रोत्साहन दिले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, लघु व्यवसायांना व्हाट्सएप बिझनेस एपची क्षमता ओळखता येईल, तसेच ते ग्राहकांशी जोडले जाऊन त्यांच्या व्यवसायाचे प्रमाण वाढवू शकतील. अशा उपक्रमामुळे भारतातील लघु व्यवसाय डिजिटल अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सज्ज होतील. व्हाट्सएपचा हा उपक्रम देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देत, भारतातील उद्योजकतेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल.