कधीकाळी स्मार्टफोनच्या दुनियेत होते मोठे नाव, आता मुकेश अंबानींना देणार टक्कर; वाचा... कोण आहेत राहूल शर्मा!
एक काळ होता जेव्हा बाजारात मायक्रोमॅक्सच्या मोबाईलचा डंका होता. विशेष म्हणजे या मोबाईल कंपनीने नामांकित सॅमसंग कंपनीला देखील मागे टाकले होते. मात्र, त्यानंतरच्या काळात मायक्रोमॅक्सचे मोबाईल बाजारातून हळूहळू गायब झाले. त्यामुळे आता कंपनी आता पुन्हा पुरागमन करण्याचा विचार करत आहे. आता ही कंपनी नवीन व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे या बिझनेसमध्ये ही कंपनी मुकेश अंबानींसारख्या मोठ्या उद्योगपतींचा देखील सामना करणार आहे.
ही कंपनी मुकेश अंबानींशी करेल स्पर्धा
मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक आणि सीईओ राहुल शर्मा यांनी आपल्या व्यवसायात मुकेश अंबानी यांच्याशी स्पर्धा करण्याची तयारी केली आहे. राहुल शर्मा यांची कंपनी मायक्रोमॅक्स आता नवीन व्यवसायात उतरणार आहे. एका नामांकित वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मायक्रोमॅक्स ओटीटी व्यवसायात प्रवेश करणार आहे. कंपनीचे सहसंस्थापक राहुल शर्मा कंटेंट ॲप तयार करणार आहेत. या नवीन ॲपच्या माध्यमातून ते मुकेश अंबानींसह अनेक बड्या उद्योगपतींना आव्हान देणार आहेत.
हे देखील वाचा – शेअर बाजारात पडझडीचे सत्र सुरुच; ‘या’ शेअर्समध्ये मोठी घसरण! वाचा… आज काय घडलंय!
कोण आहे राहुल शर्मा?
राहुल शर्मा हे मायक्रोमॅक्सचे सीईओ आणि सह-संस्थापक आहेत. त्यांनी 2000 मध्ये वडिलांकडून 3 लाख रुपये घेऊन मायक्रोमॅक्स कंपनी सुरू केली होती. त्यांनी राजेश अग्रवाल, विकास जैन आणि सुमीत अरोरा या मित्रांसोबत मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स कंपनी सुरू केली. 2008 मध्ये त्यांनी मोबाईल उत्पादन सुरू केले. स्वस्त स्मार्टफोन बनवणारी कंपनी म्हणून या कंपनीने अल्पावधीच ठसा उमटवला. 1300 कोटी रुपयांचे मालक राहुल शर्मा यांनी 2017 मध्ये भारतातील पहिली एआय आधारित इलेक्ट्रिक बाइक सादर केली. त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री असीम हिच्याशी लग्न केले आहे.
ओटीटी क्षेत्रात मोठा बदल होणार
नव्या व्यवसायात उतरणाऱ्या राहुल शर्मांची चीन आणि इतर देशांच्या कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्यासोबत मिळून ते मायक्रोमॅक्सचे कंटेंट ॲप तयार करणार आहे. ज्यावर अनेक ओटीटी स्ट्रीमिंग ॲप्स उपलब्ध असतील. त्यांच्या या निर्णयामुळे ओटीटी क्षेत्रात मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे. अंबानींच्या जिओ ॲपवर अनेक प्लॅटफॉर्म आधीच उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे Jio, Disney+ Hotstar सारखे अनेक प्लॅटफॉर्म आहेत.
दरम्यान, या व्यवसायात मायक्रोमॅक्सच्या प्रवेशामुळे जिओला कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. एवढेच नाही तर मायक्रोमॅक्स एआय हार्डवेअर सेक्टरसाठी तैवानच्या कंपन्यांशी बोलणी करत आहे. अलीकडेच कंपनीने ग्रेटर नोएडा येथील विवोची मोबाईल फोन फॅक्टरी ताब्यात घेतली आहे. या ठिकाणी कंपनी आपल्या एका उपक्रमाच्या सहकार्याने मोबाईल फोन, आयटी हार्डवेअर आणि ऑटोमोटिव्ह पार्ट्स बनवणार आहे. कंपनी एआय डेटा सेंटर्स तयार करणार आहे.