फोटो सौजन्य - Social Media
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या MHT CET परीक्षेच्या नोंदणीस राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने मुदतवाढ दिली आहे. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बीएचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) तसेच एमबीए (इंटिग्रेटेड) आणि एमसीए (इंटिग्रेटेड) या सात अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता १८ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ मार्च होती.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, या सात अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत एकूण ५६ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी आणि उर्वरित इच्छुकांना अर्ज करता यावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज, नोंदणीचे वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याद्वारे ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन कक्षाने केले आहे.
या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा २८ एप्रिल २०२६ रोजी सुरु होणार आहे, तर ही परीक्षा ३० एप्रिल २०२६ या तारखे दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जकर्त्यांनी या परीक्षेच्या तयारीला लागावे लागणार आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत नोंदणी करून परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मागील वर्षीही या अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. २०२५ मध्ये बीएचएमसीटी सीईटीसाठी १,४३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड) आणि एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी एकूण १ लाख १२ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






