गौतम अदानींनंतर कोण सांभाळणार अदानी समूहाचा गाडा; ठरलेत 'हे' चार वारसदार!
आशियातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार केले आहे. 2030 पर्यंत ते आपल्या मुलांकडे आणि पुतण्यांकडे अदानी समूहाची जबाबदारी सोपवणार आहेत. आपल्या व्यवसायाचे साम्राज्य पुढच्या पिढीकडे सोपवण्यासाठी त्यांनी २०१८ पासूनच तयारी सुरू केली होती. अदानी समूहाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांची मुले करण अदानी आणि जीत अदानी या दोघांसह पुतणे सागर अदानी आणि प्रणव अदानी यांच्या खांद्यावर असणार आहे.
गौतम अदानी अध्यक्षपद सोडणार
ब्लूमबर्ग टीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, गौतम अदानी यांनी 2018 मध्ये आपल्या मुलांना आणि पुतण्यांना अहमदाबादमध्ये बोलावले होते. भविष्यात एकत्र किंवा वेगळे काम करायला आवडेल का? असा प्रश्नही त्यांनी चौघांना विचारला होता. यावर उत्तर देण्यासाठी प्रत्येकाला 3 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. गौतम अदानी यांना वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त व्हायचे आहे. अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 213 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्ग प्रकरणासह अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे.
हेही वाचा : ‘या’ भारतीय कंपन्यांची चिंता वाढली; बांग्लादेशातील अस्थिरतेमुळे गुंतवणूक धोक्यात!
चौघेही एकत्र काम करणार
गौतम अदानी यांनी ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “उत्तराधिकारी निवडणे हा कोणत्याही व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. अदानी कुटुंबातील पुढच्या पिढीने हा निर्णय जबाबदारीने घ्यावा, असे मला वाटते. त्यांनी सांगितले की करण, जीत, प्रणव आणि सागर यांनी त्यांना प्रॉमिस केले आहे की ते एकत्र कुटुंबाप्रमाणे अदानी समूहाला पुढे नेतील. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या ठरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही कंपन्यांवर वेगळे होण्याऐवजी त्याला एकत्र काम करायचे आहे.”
कमोडिटी ट्रेडिंग कंपनी म्हणून सुरुवात
अदानी समूहाची सुरुवात गौतम अदानी, विनोद अदानी आणि राजेश अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग कंपनी म्हणून केली होती. यानंतर, अदानी समूहाचा व्यवसाय बंदर, विमानतळ, कोळसा आणि ऊर्जा यासह अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारला आहे. आता अदानी समूह परदेशातही काम करत आहे. अदानी समूहाचे अध्यक्षपद करण अदानी किंवा प्रणव अदानी यांच्याकडे सोपवले जाईल, असे मानले जात आहे. मात्र, सध्या दोघेही त्याचा तयार नसल्याचे सांगितले जात आहे. अदानी कुटुंबातील मुलीही भविष्यात व्यवसायात मदत करतील, असे सांगितले जात आहे.