फोटो सौजन्य - Social Media
ठाणे येथील जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी दहा दिवसीय मूल्यवर्धित अभ्यासक्रम 17 ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान उत्साहात पार पडला. समाजातील ज्येष्ठांना मानसिक, सामाजिक, कायदेशीर, तांत्रिक आणि आरोग्यविषयक बदलांबद्दल माहिती देऊन त्यांना नव्या युगाशी सक्षमपणे जोडण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
या अभ्यासक्रमात ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ शुभा थत्ते, विधीज्ञ प्रशांत पंचाक्षरी, ‘सप्त सोपान’ संस्थेच्या अलकनंदा पाध्ये, आहारतज्ज्ञ राजश्री केळकर, डॉ. शासने, सायबर तज्ञ प्रसाद जोशी, प्रा. प्रज्ञा पंडित, डॉ. विमुक्ता राजे आणि फिजिओथेरपिस्ट प्राची टोकेकर यांनी ज्येष्ठांसाठी अत्यंत उपयुक्त व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि उपक्रम घेतले. दैनंदिन आरोग्याची काळजी, मानसिक सक्रियता, सायबर सुरक्षा, कायदेशीर जागरूकता आणि संतुलित आहार या विविध विषयांवर झालेली सखोल चर्चा ज्येष्ठांना अतिशय आवडली. प्रत्येक सत्राच्या प्रारंभी प्रिथा शेट्टी यांनी योगसत्र घेतल्याने सहभागी ज्येष्ठ नागरिकांना नवीन उर्जा मिळाली.
या अभ्यासक्रमात 18 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते आनंद भागवत, ऍडव्होकेट वासुदेव गांगल आणि डॉ. माधुरी पेजावर यांच्यासोबत विशेष परिसंवादही आयोजित करण्यात आला. या परिसंवादाचे समन्वयन आणि मुलाखत प्रा. मानसी जंगम यांनी केली. सांगता समारंभासाठी सोफिया महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि वार्धक्य तज्ञ डॉ. अनघा तेंडुलकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाचे कौतुक करत महाविद्यालयाने राबविलेल्या या उपक्रमाला काळाची गरज असल्याचे नमूद केले.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. प्रियांवदा टोकेकर, डॉ. श्वेता अहिरे, प्रा. स्वप्नील मयेकर आणि राज्यशास्त्राच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे, डॉ. महेश पाटील तसेच जिमखाना प्रमुख डॉ. प्रमोद खराटे यांचे सहकार्यही लाभले. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही ज्येष्ठांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने महाविद्यालयाने अशा अभ्यासक्रमाचे वार्षिक आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला असून, पुढील काळात हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






