फोटो सौजन्य - Social Media
राज्यभरातील अकरावीच्या प्रवेशासाठी प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत सुरू असलेल्या FYJC (First Year Junior College) ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी अखेर ३० जून रोजी जाहीर झाली. या यादीत एकूण ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जागा अलॉट करण्यात आली आहे.
या यादीनुसार, विद्यार्थ्यांनी ३० जून ते ७ जुलै या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे. याआधी ही यादी २७ जून रोजी जाहीर होणार होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आला होता.
या वर्षी एकूण १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांनी ११वीच्या प्रवेशासाठी अर्ज केला होता. त्यापैकी ६.३२ लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीत प्रवेश मिळाल्याने, ४.३३ लाख विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीची वाट बघावी लागणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
शाखावार अलॉटमेंट तपशीलः
विद्यार्थ्यांनी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन गुणवत्ता यादी पाहू शकतात. प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही अडचण असल्यास 8530955564 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. शैक्षणिक वर्ष 2024–25 साठीची ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी शासनाने वेळापत्रकात आवश्यक त्या सुधारणा करत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रयत्न केले आहेत. आता पुढील फेरीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सतर्क राहून रिक्त जागांची यादी आणि नवीन वेळापत्रकावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.