फोटो सौजन्य - Social Media
त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे हल्ला झाल्यास कसे प्रतिसाद द्यावे हे दाखवले. शाळेची बॅग, पाण्याची बाटली, ओळखपत्र यांसारख्या साध्या वस्तू संकटसमयी किती प्रभावी ठरू शकतात, हे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष प्रदर्शित केले. उपस्थितांनी या रोजच्या वापरातील वस्तूंचा संरक्षणासाठी होणारा उपयोग पाहून कौतुक व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल जागरूक राहण्याचे, संशयास्पद हालचाली लगेच ओळखण्याचे आणि धोका जाणवल्यास तत्काळ स्वतःचे रक्षण करण्याचे आवाहन केले.
आत्मसंरक्षण ही केवळ लढण्याची कला नसून त्यामध्ये मानसिक ताकद, जलद निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासाची गरज असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. शरीर तंदुरुस्त असेल तर कोणत्याही प्रकारच्या प्रसंगाला तोंड देणे अधिक सोपे होते, म्हणूनच नियमित व्यायाम, योग्य आहार आणि फिटनेसची शिस्त पाळणे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात महिला प्रशिक्षिका हर्षदा पाडेकर, कराटेपटू हर्ष मालवी आणि मोहित कोळी यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तंत्र शिकवण्यास मदत केली.
शाळेचे मुख्याध्यापक जेकब थॉमस, क्रीडा शिक्षक उमेश भिने आणि सर्व शिक्षकांनी या उपक्रमासाठी आवश्यक असलेली तयारी आणि व्यवस्था करून संपूर्ण प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवल्यामुळे प्रशिक्षकांनाही ऊर्जा मिळाली आणि प्रशिक्षण अधिक परिणामकारक ठरले. समाजात घडणाऱ्या अत्याचार, छळ किंवा अनपेक्षित धोके यांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता तयार राहावे, यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची शाळांनी नियमितपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे विनायक कोळी यांनी आवर्जून सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आत्मसंरक्षण प्रशिक्षण आता काळाची गरज बनली असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडून येतात, आत्मविश्वास वाढतो आणि ते समाजात अधिक सक्षमतेने वागू शकतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि शिक्षकांनी व्यक्त केलेले समाधान पाहता हा उपक्रम सर्वार्थाने उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट झाले. शाळेने घेतलेल्या पुढाकाराचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे सर्वत्र कौतुक होत असून इतर शाळांनीही अशी उपक्रम राबवण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.






