फोटो सौजन्य - Social Media
शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे म्हणाले की, शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडणीचे केंद्र असते. शाळेतून मिळालेले ज्ञान, मूल्ये आणि संस्कार याच आधारावर विद्यार्थ्यांचा पुढील जीवनप्रवास उभा राहतो. समाजकारण, प्रशासन, राजकारण, संशोधन, व्यापार, उद्योग, शेती यांसह विविध क्षेत्रांत माजी विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती ही शाळेच्या गुणवत्तेचे द्योतक आहे, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, भारत बोरनारे स्वतः कडोमनपा शाळा तिसगाव आणि डोंबिवली येथील महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी दोन्ही शाळांच्या स्नेह मेळाव्यास स्वतः हजेरी लावली.
राष्ट्र उभारणीसाठी शाळेतील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी सातत्याने योगदान देत आहेत. शाळेने दिलेल्या घडणीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक माजी विद्यार्थी शाळेच्या विकासकामात आर्थिक, तांत्रिक तसेच सामाजिक स्वरूपाचे योगदान देत आहेत. त्यांच्या (Alumni Association) सहकार्यामुळे शाळांची गुणवत्ता वृद्धिंगत होण्यास, सुविधा वाढण्यास आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीला अधिक चांगली चालना मिळण्यास मदत होत आहे. शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या नियोजनानुसार १९ नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघांचे उपक्रम उत्साहात राबविण्यात आले असून, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचा प्रतिसाद समाधानकारक मिळाला आहे. नवीन पिढीशी जुनी पिढी जोडण्याचा आणि शाळा–विद्यार्थी नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा या उपक्रमाचा उद्देश यशस्वी होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.






